तुळजापूर : महाराष्ट्राचे माजी आणि दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दुसऱ्या पुत्राचीही राजकारणात एन्ट्री होत आहे. धीरज देशमुख यांना लातूरमधून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर अभिनेता रितेश देशमुखसह संपूर्ण देशमुख कुटुंब तुळजाभवानीच्या चरणी (Riteish Deshmukh in Tulajapur) लीन झालं.
रितेश देशमुखने ट्विटरवरुन फोटो शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. फोटोमध्ये रितेश देशमुख, त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुजा देशमुख, त्यांच्या मातोश्री, बंधू धीरज देशमुख आणि त्यांची पत्नी दिसत आहेत.
‘आज आई तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं. मन प्रसन्न झालं. आदिशक्तीच्या चरणी लीन होताना एका नवीन ऊर्जेची अनुभूती झाली’ असं ट्वीट रितेश देशमुखने केलं आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने रितेशने देवीचं दर्शन (Riteish Deshmukh in Tulajapur) घेतलं. निवडणुकीत दोन्ही मुलांना विजय मिळू दे, यासाठी देशमुखांनी तुळजाभवानीकडे साकडं घातलं असावं.
आज आई तुळजाभवानी देवीच दर्शन घेतलं.. मन प्रसन्न झाल.. आदिशक्तीच्या चरणी लिन होताना एका नवीन ऊर्जेची अनुभूती झाली..? pic.twitter.com/eE8uw8UTcw
— Riteish Deshmukh (@Riteishd) October 2, 2019
लातूर शहर या मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि विलासरावांचे ज्येष्ठ पुत्र अमित देशमुख पुन्हा नशीब आजमावणार आहेत. तर धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे देशमुखांच्या दोन्ही मुलांचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेसने एक ऑक्टोबरला जाहीर केलेल्या दुसऱ्या उमेदवार यादीत 52 उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत काँग्रेसने 123 उमेदवार जाहीर केले आहेत.