मुंबई: फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश निघाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावलाय. या योजनेमुळे ‘शिवार’ खरंच जलयुक्त झाले की फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले?, हे आता स्पष्ट होईल, असे रोहित यांनी म्हटले. ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा मागील भाजप सरकारने गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला.तब्बल ९६३३ कोटी ₹ खर्चूनही भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर हे पैसे कुठं मुरले व कुणाची पातळी उंचावली याचा तपास होण्याची गरज रोहित पवार यांनी व्यक्त केली. (Rohit Pawar on jalyukta shivar scheme)
तसेच जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. त्यामुळे ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल. https://t.co/AAkrL9Q6T1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 14, 2020
रोहित पवार चर्चेत राहण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांवर टीका करतात, असा आरोप नुकताच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यानंतर रोहित पवार यांनी भाजपला पुन्हा एकदा डिवचले आहे. त्यामुळे आता भाजप रोहित पवारांना काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीमुळे भाजप पेचात सापडण्याची शक्यता आहे. यापूर्वी ‘कॅग’च्या अहवालातही जलयुक्त शिवार योजनेवर ताशेरे ओढण्यात आले होते. अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यात जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरली, असे ‘कॅग’ने म्हटले होते. त्यामुळे आता एसआयटी चौकशीत आणखी काय माहिती पुढे येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
संबंधित बातम्या:
Special Report | फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेची SIT द्वारे चौकशीचे आदेश!
फडणवीसच म्हणाले होते जलयुक्त शिवारची चौकशी करा, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया
जलयुक्त शिवारची चौकशी म्हणजे कष्टकऱ्यांच्या घामाची चौकशी करणार काय?, आशिष शेलारांचा सवाल
जलयुक्त शिवाराची ओपन चौकशी होईल; भाजपने घाबरून जाऊ नये; जयंत पाटलांचा खोचक टोला
(Rohit Pawar on jalyukta shivar scheme)