अहमदनगर : शिंदे, फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर (Cabinet Expansion) आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यावेळी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्यावर रोहित पवारांनी (Rohit Pawar) टीका केलीय. तसंच मंत्रिमंडळात महिलांना स्थान मिळायला हवं होतं. चाळीस दिवसानंतर का असेना शेवटी विस्तार झाला, 18 मंत्र्यांना संधी दिली त्यामुळे कॅबिनेटचा कोरम पूर्ण होईल. कॅबिनेटमध्ये 12 मंत्री असल्याशिवाय निर्णय ग्राह्य धरला जात नाही. आता तो ग्राह्य धरला जाईल. आता लवकरात लवकर पालकमंत्री (Guardian Minister) देऊन प्रत्येक जिल्ह्याच्या अडचणी कशा सोडता येईल याकडे लक्ष देणे गरजेचं असल्याचं मतही रोहित पवार यांनी व्यक्त केलंय. ते आज अहमदनगरमध्ये बोलत होते.
मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेचा समावेश नसल्याच्या मुद्द्यावर रोहित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळात महिलांना स्थान दिले पाहिजे होतं. 50 टक्के महिलांना आरक्षण असून महिलांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न सर्व पक्षांनी केला आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये महिलांना संधी दिली नसावी. मात्र दुसऱ्या कॅबिनेमध्ये जास्तीत जास्त महिलांना संधी देतील अशी अपेक्षा आपण नक्की करू शकतो.
संजय राठोड यांना देण्यात आलेल्या मंत्रिमंडळातील स्थानाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, संजय राठोड महाविकास आघाडीत होते त्यावेळी विरोधी पक्षाचे नेते त्यांच्या विरोधात बोलले. तर टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांचं नाव आलेलं आहे. विरोधात असताना तुम्ही टीका करता. मात्र, सत्तेत आल्यावर तुमची भूमिका बदलत असेल तर लोक पाहत आहेत, असा टोला त्यांनी लगावलाय. चित्रा वाघ यांनी संबंधित तरुणीच्या बाजूने मत व्यक्त केलं ही चांगली गोष्ट असल्याचंही रोहित पवार म्हणाले.
कर्जतमधील तरुणावर झालेल्या हल्ला प्रकरणावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. लोकांची सहानुभूती सनी पवार बरोबर आहे, अशा पद्धतीने कुणी कोणाला मारु नये. मात्र ज्या पद्धतीने राजकारण आणलं गेलं हे योग्य नसल्याचं तिथल्या सामान्य लोकांच म्हणणं आहे. तिथे असलेली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. असं असताना बाहेरून येऊन तिथलं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या गोष्टी लोकांना आवडत नाही, अशी टीका रोहित पवार यांनी विरोधकांवर केलीय. ही बातमी देशपातळीवर जावी, काही लोकांचं नाव देशपातळीवर जावं, त्यासाठी हा प्रयत्न असावा असा टोलाही रोहित पवारांनी आमदार नितेश राणेंचं नाव न घेता लगावलाय.