अहमदनगर : राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या स्वागतासाठी जामखेड शहर सज्ज झालं आहे. रोहित पवारांच्या विजयी मिरवणुकीत एक-दोन नव्हे, तर तब्बल 30 जेसीबीच्या फाळक्यातून गुलाल उधळला (Rohit Pawar JCB Celebration) जाणार आहे.
अहमदनगरमधील जामखेड शहरातून रोहित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक चौकात एक जेसीबी उभा करण्यात आला आहे. 30 जेसीबींमधून गुलाल उधळून करणार रोहित पवार यांचं स्वागत करण्यात येणार आहे.
निवडून आल्यानंतर रोहित पवार पहिल्यांदाच जामखेड शहरात दाखल होत आहेत. जनतेचे आभार मानण्यासाठी रोहित पवार आपल्या मतदारसंघात येणार आहेत. आभार मानल्यानंतर रोहित पवार यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जेसीबीतून गुलाल उधळण्याची नवी पद्धत आणली आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळीत विजय मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या फाळक्यातून गुलाल उधळत सेलिब्रेशन केलं होतं. काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर ट्रेण्ड झालेल्या ‘जेसीबी की खुदाई’ या हॅशटॅगनंतर आता ‘जेसीबी मे सेलिब्रेशन’ (Rohit Pawar JCB Celebration) ट्रेण्डिंगमध्ये दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी भाजचे मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. रोहित पवार यांना कर्जत जामखेड मतदारसंघातून 1 लाख 34 हजार 848 मतं मिळाली. तर राम शिंदे यांना 91 हजार 815 मते मिळाली. रोहित पवार यांनी राम शिंदेंना 43 हजार 947 मताधिक्यांनी पराभूत केले.
रोहित पवारांचा कनेक्ट
रोहित पवार यांच्या विजयासाठी जामखेड तालुक्यातील हळगावमधील एक महिलेने महिनाभरापासून उपवास केला होता. विशेष म्हणजे खुद्द रोहित पवार यांनी विमल मंडलिक यांना घास भरवत त्यांचा उपवास सोडला.
प्रतिस्पर्ध्यांशी जवळीक
निवडणूक म्हटलं की राजकीय पक्ष आपल्या प्रतिस्पर्धी पक्षांवर अगदी तुटून पडतात. अनेक आरोप प्रत्यारोप होतात. कार्यकर्ते तर आपल्या नेत्यांच्या पुढे जाऊन विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत शत्रुत्व घेत वागतात. मात्र, निवडणूक संपली की या सर्वच हेवे-दाव्यांपलिकडे जाऊन एकत्र येऊन काम करणं महत्त्वाचं असतं.
रोहित पवार यांनी आपला प्रतिस्पर्धी पक्ष शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांना स्वतः फोन करुन त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील रोहित पवार यांना शुभेच्छा दिल्या. नव्या पिढीतील या राजकीय नेत्यांनी निवडणुकीनंतर एकमेकांना दिलेल्या या मैत्रीपूर्ण शुभेच्छांमुळे महाराष्ट्राची खरी सभ्य राजकीय संस्कृती जपली जात असल्याचीही भावना व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर देखील विरोधी पक्ष भाजपचे उमेदवार राम शिंदे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. तसेच निवडणुकीतील वाद थांबवायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यावेळी राम शिंदेंच्या मातोश्रींनी रोहित यांना फेटा बांधून विजय टिळक लावलं. रोहित पवार यांनी यापुढे आपण कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचंही नमूद केलं होतं.
Rohit Pawar JCB Celebration