बारामती : राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) यांच्यावर टीका केली आहे. माझ्या विरोधकांना केवळ विरोध करणं माहितीये. विकासाबद्दल त्यांना काहीही घेणं-देणं नाही. माझ्यावर कारवाई करण्याबाबत त्यांनी राजकीय दृष्टीकोनातून भलंमोठं पत्र लिहिलं. त्याचवेळी त्यांनी अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबतही पत्र लिहले असतं तर मान्य केलं असतं. केवळ आपली सत्ता आलीय आणि त्यातून आपल्या विरोधकावर कारवाई करायची हा त्यांचा हेतू आहे. सरकार आल्यामुळे सध्या ते हवेत गेल्यासारखं वाटतं, असं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणालेत.
सध्या होणाऱ्या पावसावरही रोहित पवार बोललेत. गेल्यावर्षी राज्यात 110 टक्के पाऊस झाला. त्यावेळी आताच्या सत्ताधाऱ्यांनी आणि तत्कालीन विरोधकांनी ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली होती. आता 126 टक्के पाऊस झाला आहे. मागच्या वर्षी तुम्ही मागणी करत होता. आता तुमचं सरकार आहे मग ओला दुष्काळ का जाहिर करत नाही? यातून तुमचा सत्तेत असताना आणि नसताना असलेला राजकीय दृष्टीकोन दिसतो, असं रोहित पवार म्हणालेत. शिवाय तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करावा, असंही ते म्हणालेत.
दिवाळीला शिधा वाटप करण्याची कल्पना चांगली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे लोकांपर्यंत शिधा पोहोचला नाही. काही ठराविक ठिकाणीच वाटप होतंय. महसूल विभागावर मोठ्या प्रमाणात ताण आलाय. अतिवृष्टी पंचनामे करायचे आणि शिधा पोहोचवायचा अशी कामं महसूल विभागाला करावी लागत आहेत.याचं नियोजन आधीच होणे गरजेचं होतं.त्यातून लोकांना फायदा झाला असता आणि महसूल खात्याला पंचनामे सोडून शिधा वाटपावर लक्ष देण्याची गरज पडली नसती, असं रोहित पवार म्हणालेत.