पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांविरोधात मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याला शिवतीर्थावरील सभा आणि ठाण्यात झालेल्या उत्तर सभेतही राज यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच राज्यात जातीयवाद वाढल्याचा गंभीर आरोप राज यांनी केलाय. राज ठाकरेंच्या आरोपांना खुद्द शरद पवार यांनीही प्रत्युत्तर दिलंय. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावलाय. राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपची आहे. तसंच अंगावर शॉल टाकली म्हणजे कुणी बाळासाहेब होत नाही, असा पलटवार रोहित पवार यांनी केलाय.
राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नरेटिव्ह सेट केला जातोय. राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपची आहे. राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करत आहेत. मात्र अंगावर शॉल टाकली म्हणजे बाळासाहेब होत नाही. राज ठाकरे हे चांगले अभिनेते आहेत, ते चांगला अभिनय करत आहेत. मला राज ठाकरे यांचं भाषण आवडायचं. मात्र, आता ते भाजप सागंत आहे तसं करत आहेत. कोणताही नेता पुन्हा घडत नाही, अशा शब्दात रोहित पवार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर सध्या विकासाच्या मुद्द्यावर कुणीही बोलत नाही. मात्र, आपण विकासाचे मुद्दे लोकांसमोर घेऊन जाणार असल्याचंही रोहित पवार म्हणाले.
राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीवादाचा गंभीर आरोप केला. देशात हजारो वर्षापासून जात आहे. ‘प्रत्येक व्यक्तीला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता. पण 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला. आमच्या मुलांची माथी भडकावली गेली. शरद पवार सांगतात इतिहास चुकीचा सांगितला गेला. राष्ट्रवादीने संभाजी बी ग्रेड का सी ग्रेड सारख्या संघटना काढल्या. या संघटना 1999 सालानंतर कशा आल्या? हा योगायोगा नाही, त्या त्यांनीच काढल्या’, अशा शब्दात राज यांनी पवारांवर निशाणा साधला होता.
इतर बातम्या :