नागपूरः राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी लोकसभेत बोलताना माजी पर्यावरण मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) सुशांतसिंह राजपुत (Sushantsingh Rajput) प्रकरणावरून गंभीर आरोप केले. एरवी संसदेत काहीही न बोलणारे राहुल शेवाळे काल बोलले आणि नेमका हाच विषय का काढला, असा टोला रोहित पवारांनी लगावला. तर यामागील कारण काय आहे, हेही सांगितलं.
आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. मुंबईतील बिहारी लोकांची मतं मिळवण्यासाठी राहुल शेवाळेंनी असे आरोप केल्याचं रोहित पवार म्हणाले.
नागपुरात टीव्ही9 च्या प्रतिनिधींशी बोलताना रोहित पवार म्हणाले, शेवाळे कधी बोलत नाहीत. बोलून बोलून काय मागितला तर मोबाइल नंबर.. त्यावरचे नाव कुणाचं असा प्रश्न केला. महाराष्ट्राचे प्रश्न तरी मांडायला हवे होते…
काही दिवसांपूर्वी बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचं राजकारण केलं गेलं. आदित्य ठाकरेंसह इतर लोकांचं त्यात नाव आणण्याचा प्रयत्न केला गेला.
तरीही आता हा विषय आणला. मुंबईच्या निवडणुकीत बिहारी मतदान असल्यामुळे हे सुरु आहे. या लोकांना फक्त आणि फक्त राजकारण करायचं आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
सुशांतसिंग राजपूतची मैत्रीण त्याला ड्रग्ज देत असल्याचा आरोप आहे. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला AU नावाने 44 फोन आल्याचा आरोप दावा बिहार पोलिसांनी केला आहे. हे AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे आहेत का, याची चौकशी करावी, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे. काल प्रसार माध्यमांशी बोलताना राहुल शेवाळेंनी ही मागणी केली.
राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून संजय राऊत यांनीही सणकून टीका केली. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयसह अनेक तपास यंत्रणांनी केलाय.
त्यांनी सुशांतची आत्महत्याच असल्याचं म्हटलंय. तरीही ज्यांच्यावर बलात्कारापासून विनयभंगापर्यंत अनेक आरोप आहेत, अशा व्यक्तीने आदित्य ठाकरेंवर आरोप करणं म्हणजे हे लोक किती खालच्या थरावर गेले आहेत, हे दिसून येतं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.