मुंबई : सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. तरुणाईसाठी असलेल्या या खास दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचाही पाऊस पडत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी तरुणांना प्रेम दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांना सल्लाही दिला आहे (Rohit Pawar wish Valentine Day). ते म्हणाले, “हा दिवस स्वच्छ आणि खऱ्या अर्थानं निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे. आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या… गॅसचा दर 910 रुपये प्रती सिलिंडर झालाय.” रोहित पवार यांनी ट्विट करत हे मत व्यक्त केलं.
रोहित पवार यांनी तरुणाच्या केंद्रस्थानी असलेल्या व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधून केंद्र सरकारच्या धोरणांना लक्ष्य केलं. आहे. केंद्र सरकारच्या अपयशामुळेच महागाई वाढत आहे. त्यामुळेच आज स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत 910 रुपये झाल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे!
हा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे. आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या… गॅसचा दर ९१० रुपये प्रती सिलिंडर झालाय.— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 14, 2020
दरम्यान, महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला पुन्हा एकदा गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाल्यानं मोठा धक्का बसला आहे. इंडियन गॅसच्या विना अनुदानित असलेल्या गॅस सिलेंडरच्या दरात 145 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली. दिल्ली विधानसभा निवडणुका पार पडताच गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्याने सरकारबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे.
कोणतीही दरवाढ किंवा घट ही प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला होते. मात्र, गॅस सिलिंडरच्या किमती अचानक वाढवल्याने ग्राहकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. मंगळवारपर्यंत (11 फेब्रुवारी) सिलेंडरचा दर 721. 50 रुपये इतका होता. मात्र, आज तो वाढून 866.50 रुपये झाला आहे. पुण्यात काल 704 तर आज तब्बल 849 रुपये असा सिलेंडरचा दर आहे.
Prices of non-subsidised 14 kg Indane gas in metros, applicable from today: In Delhi price rises to Rs 858.50 (increase by Rs 144.50), in Kolkata – Rs 896.00 (increase by Rs 149), in Mumbai – Rs 829.50 (increase by Rs 145), in Chennai – Rs 881.00 (increase by Rs 147). pic.twitter.com/0kbynJJld7
— ANI (@ANI) February 12, 2020
मुंबईत एका सिलेंडरमागे आता 829.50 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, दिल्लीतील सिलेंडरची किंमत 144.50 रुपयांनी वाढून 858. 50 रुपये झाली आहे. तर, कोलकातामध्ये 149 रुपयांची दरवाढ झाली आहे. चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतीत 147 रुपयांची वाढ झाली असून आता गॅसच्या किमती 881 रुपये झाल्या आहेत.
दोन महिन्यात सामान्यांच्या खिशावर 200 रुपयांता बोजा
गेल्या डिसेंबर महिन्यात दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या विना अनुदानित असलेल्या सिलेंडरसाठी 695 रुपये मोजावे लागत होते. तर कोलकात्यात 725.50 रुपये द्यावे लागत होते. मुंबईमध्ये एका सिलेंडरमागे 665 रुपये तर चेन्नईमध्ये 714 रुपये मोजावे लागत होते. मात्र, अवघ्या दोन महिन्यांच्या आत सामान्यांच्या खिशावर तब्बल 200 रुपयांता बोजा वाढला आहे.
संबंधित व्हिडीओ :