मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केलीय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हातावर पोट असलेले मजूर आणि छोट्या व्यवसायिकांसाठी आर्थिक पॅकेज देऊ केलंय. पण हे पॅकेज म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचं काम असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारला काही सूचना केल्यात. त्यावरुन आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला एकप्रकारे आसरा दाखवलाय. रोहित पवारांनी एक फेसबुक पोस्ट लिहून भाजपशासित राज्यातील परिस्थिती विरोधकांच्या नजरेस आणून दिलीय. (Rohit Pawar’s Facebook post appeals to BJP leaders to avoid politics on Corona issue)
केंद्रीय आरोग्य विभागाची आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्राव्यतिरिक्त छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, पंजाब, बंगाल, तेलंगणा ,आंध्र प्रदेश, हरयाणा, बिहार आदी राज्यांमध्येही कोरोनाचं संकट भीषण असल्याचं दिसून येतं. इतर राज्यांची आकडेवारी महाराष्ट्राइतकी नसली तरी त्या राज्यांच्या लोकसंख्येच्या व शहरीकरणाच्या तुलनेत ती निश्चितच चिंताजनक आहे. ज्या राज्यांमध्ये महाराष्ट्रासारखे शहरीकरण अधिक आहे तिथं रुग्णांची संख्याही अधिक असल्याचं दिसून येतं. महाराष्ट्रातही एकूण रुग्णांच्या जवळपास 50 टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर अशा मोठ्या शहरांमध्येच आहेत.
मला विरोधकांनाही सांगायचंय की ही वेळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची नसून एकत्रितपणे संकटाचा मुकाबला करण्याची आहे. ही लढाई कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण मानवतेची आहे…https://t.co/RgLbn5msEE pic.twitter.com/OH8w511qHR
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 14, 2021
वरील राज्यांपैकी सहा राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे त्यामुळे भाजपशासित राज्यांमधील कोरोना व्यवस्थापन खूपच चांगलं असल्याने तिथं कोरोना येत नाही हा विरोधकांचा दावा फोल ठरतो. आज जेंव्हा मी भाजपच्या नेत्यांना मीडियाशी बोलतांना पाहतो तेंव्हा ते महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन राजकारण करणं थांबवत नाहीयेत हे दुर्दैवी वाटतं. आज राजकारणाची वेळ नसतानाही महाराष्ट्रातील सरकार असमर्थ आहे, इथली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली अशाप्रकारची विधानं विरोधकांकडून केली जात आहेत. ही गोष्ट मात्र निश्चितच खरीय की महाराष्ट्रात रुग्ण संख्या जास्त आहे आणि काही रुग्णांची काही प्रमाणात गैरसोय होतेय, मात्र हे संकट रोखण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सर्व राज्यसरकार करतंय हेही तेवढंच खरंय. पहिल्या लाटेपेक्षा ही लाट अत्यंत तीव्र आहे, रुग्णवाढीचा वेगही अधिक आहे.
कोरोना लसीकरणात आज महाराष्ट्र संपूर्ण देशात आघाडीवर आहे. आतापर्यंत राज्याने 1 कोटी 5 लाख 29 हजार लसी दिल्या. यामध्ये पहिला डोस 95 लाख 20 हजार 725 लोकांना तर दुसरा डोस 10 लाख 8 हजार लोकांना देण्यात आला. आज आपण दररोज साडेतीन ते चार लाख नागरिकांना लस देत असून आपली लसीकरणाची क्षमता 6 लाख प्रतिदिवसापर्यंत वाढवलीय. लस वाया जाण्याचे प्रमाणही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अत्यंत कमी आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कोविड सेंटरची संख्या दुपटीने वाढवली असून राज्यात चार हजार कोविड सेंटर्स आहेत. त्याच बरोबर बेड ची संख्याही आपण वर्षभरात जवळपास दुप्पट केलीय. आज आपण दिवसाला जवळपास अडीच लाखाहून अधिक टेस्ट करत आहोत. राज्य सरकारने आकडेवारीमध्ये कोणतीही लपवा छापवी केलेली नसल्यानेच महाराष्ट्रातील रुग्ण संख्या अधिक दिसते. शिवाय राज्य सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त टेस्टिंगचं टार्गेट दिलंय. Per million cases ची आकडेवारी जर पाहिली तर महाराष्ट्राचा त्यात पाचवा नंबर लागतो. महाराष्ट्रात per million केसेस जिथे 25 हजार 977 आहेत तर केरळ मध्ये 32 हजार 586 दिल्लीमध्ये 34 हजार 852 इतकी आहे. एकूणच आपण गेल्या वर्षभरात आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत, हे विसरता येणार नाही.
आज या घडीला जर गुजरातचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तिथंही रुगणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सुरत, अहमदाबाद, जामनगरमध्ये बेड मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. एका आघाडीच्या वृत्त वाहिनीने गुजरातच्या कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेचं हे केलेलं रिपोर्टिंग आपल्यापैकी अनेकजणांनी पाहिलं असेल. अनेक रुगणांवर हॉस्पिटलच्या आवारात, फरशीवर, खुर्चीवर बसून उपचार चालू असल्याचं त्यात दाखवलं. तर दुसरीकडं मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी आठ-आठ तास थांबावं लागत असल्याचं विदारक चित्र पाहताना मन हेलावून जातं. रुग्णवाहिका नसल्याने कोणी चार चाकीतून डेड बॉडी नेतंय तर कोणी हात गाड्यावरून आहे. हे आज गुजरातचं भीषण वास्तव आहे.
उत्तरप्रदेशमध्येही रुग्णांची अवस्था काही चांगली नाही. तिथं तर तीन रुग्णांना लस म्हणून रेबीजचं इंजेक्शन दिल्याची अत्यंत धक्कादायक बाब पुढं आली. बिहारमध्येही कोरोनाचे व्यवस्थापन नीट होत नसल्याचे निदर्शनास येतंय. तसंच मृतांची संख्याही सरकार लपवत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. आज देशभरातील सर्वच राज्य सरकार आर्थिक अचणीतून जात आहेत. एकीकडं उत्पन्न खुंटलंय तर दुसरीकडं केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेला हक्काचा निधी मिळत नाहीय. केंद्र सरकारकडं उत्पन्नाचे स्त्रोत्र अधिक असल्याने स्वाभाविकपणे केंद्राने या सर्व परिस्थितीत जास्तीची जबाबदारी घेणं अपेक्षित आहे पण तसं होताना दिसत नाही. जगभरात कोरोनाची एका नंतर दुसरी लाट येते हे अनुभव सर्वांना होता. त्याप्रमाणे ती भारतातही येणार हे नक्की होतं मात्र तरीही केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यात जवळपास १०० देशांमध्ये ११ लाख रेमेडेसिवीर औषधाची निर्यात केली. वास्तविक आपल्यासाठी आवश्यक तेवढा साठा झाल्यानंतरच निर्यात करणं अपेक्षित होतं.
मला आजच्या परिस्थितीबाबत कोणाला दोष द्यायचा नाहीय किंवा या मुद्याचं राजकारणही करायचं नाहीय. मला विरोधकांनाही हेच सांगायचंय की ही वेळ एकमेकांची उणी-दुणी काढण्याची नसून एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करण्याची आहे. हे संकट वेगळं आहे. ही लढाई कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण मानवतेची आहे. आमच्या विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे कोरोना हा केवळ एखाद्याच राज्यात वाढत नसून तो सगळीकडेच वाढतोय. आज या कठीण काळात सगळ्या यंत्रणेचा कस लागतोय.
आज ही स्थिती हाताळणारी प्रत्येक सरकारी यंत्रणा मग ते पोलीस असोत की आरोग्य कर्मचारी असोत की अत्यावश्यक सेवा पुरवणारी यंत्रणा असो ही प्रत्येक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येक माणूस पूर्ण क्षमतेने या परिस्थितीला सामोरा जात आहे. अशा परिस्थितीत आपण भांडत बसलो तर त्यात नुकसानच अधिक होणार आहे. आज राज्य, विभाग, प्रदेश सोडून एक देश म्हणून आपल्याला उभं राहावं लागेल आणि या संकटावर मात करावी लागेल. मानवतेच्या मुळावर उठलेल्या या संकटाचा सर्वांनी एकत्रितपणे मुकाबला करून संपूर्ण जगाला एक वेगळा संदेश आपल्याला देता येईल. त्याची हीच वेळ आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करुयात आणि कोरोनाच्या संकटाला थोपवूयात!
संबंधित बातम्या :
‘घरातील तरुण माणसं मरत आहेत आणि विरोधक राजकारणात दंग’, नाना पटोलेंचा घणाघात
Rohit Pawar’s Facebook post appeals to BJP leaders to avoid politics on Corona issue