पुणे : गेल्या काही दिवसांपासून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलचं तापलं आहे, भाजपाकडून (BJP) मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. तर शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली. सुरुवातीला ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून राजकारण रंगलं तर नंतर ठाकरे गटाकडून मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर आज अंधेरी विधासभा निवडणुकीबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. ती म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही या निवडणुकीतून माघात घेत असल्याची घोषणा केली आहे. भाजपाच्या या निर्णयानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना टोला लगावला आहे.
रोहीत पवार यांनी अंधेरी पोटनिवडणुकीवरून भाजपाला टोला लगावला आहे. आता अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होईल, असं चित्र दिसतंय. पण त्याआधी जे घडलं ते निंदनीय आहे. त्यांनी आधीच ही पोटनिवडणूक बिनविरोध करतोय असं जाहीर केलं असतं तर महाराष्ट्राची परंपरा जपली गेली असती असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना रोहित पवार यांनी आतापर्यंत हाती आलेल्या ग्रामपंचायतींच्या निकालावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीला यश मिळत आहे. हे सध्याच्या चित्रावरून दिसतंय. संध्याकाळपर्यंत हेच चित्र कायम राहील. जनतेच्या मनात काय आहे, त्यांना पक्षीय घडामोडी पचनी पडल्या नाहीत, हे निकालातून स्पष्ट दिसतंय असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.