दिल्ली : उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे माजी दिवंगत मुख्यमंत्री एनडी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी यांचे आज मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास निधन झाले. रोहित तिवारी हे 38 वर्षांचे होते. त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळच्या सुमारास रोहित यांना हार्ट अटॅक आला. त्यानंतर त्यांची आई आणि पत्नीने त्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल केले. पण तो पर्यंत रोहित यांचा मृत्यू झाला होता. दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीमध्ये रोहित त्यांच्या आई आणि पत्नीसह राहत होते. दरम्यान गेल्यावर्षी 18 ऑक्टोंबर 2018 रोजी माजी मुख्यमंत्री एनडी तिवारी यांचे निधन झाले होते. रोहित यांनी जानेवारी 2017 साली भाजपमध्ये प्रवेश केला होता.
DCP South Delhi Vijay Kumar: Rohit Shekhar Tiwari, son of late former Uttar Pradesh and Uttarakhand CM N D Tiwari, has been brought dead to Max Saket hospital.Further details are awaited. pic.twitter.com/PedZ53NECz
— ANI (@ANI) April 16, 2019
रोहित शेखर तिवारी यांनी 2008 मध्ये एनडी तिवारी यांचा मुलगा असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांनी याबाबत कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने याबाबत डीएनए टेस्ट करण्याचे सुचवले होते. त्यानुसार रोहित आणि एनडी तिवारी यांच्या डीएनए समान असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. तसेच रोहित हा एनडी तिवारी यांचाच मुलगा असल्याचे कोर्टाने सांगितले. कोर्टाने दिलेल्या या निर्णयानंतर, एनडी तिवारी यांनी रोहित शेखर याला आपला मुलगा मानले होते. विशेष म्हणजे एनडी तिवारी यांनी सर्व संपत्ती तसेच अधिकार रोहित यांना दिले होते.
एवढंच नव्हे तर, एनडी तिवारी यांनी रोहित शेखर यांच्या आई उज्जवला यांच्याशी वयाच्या 88 व्या वर्षी लग्न केले होते. उज्जवला आणि एनडी तिवारी यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र त्यानंतरही त्यांनी लग्न केले नव्हते. पण कोर्टाने रोहितला मुलगा मानावे असे आदेश दिल्यानंतर त्यांनी उज्जवला यांच्याशी लग्न केले होते. लखनौमध्ये 14 एप्रिल 2014 मध्ये एनडी तिवारी यांनी उज्जवला यांच्याशी लग्न केले होते.
मला माझे वैयक्तिक जीवन जगण्याचा संपूर्ण अधिकार आहे. माझ्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ करण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे माझ्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ करु नये असे स्पष्टीकर एनडी तिवारी यांनी लग्नानंतर दिले होते.
एनडी तिवारी यांचे वयाच्या 93 वर्षी ऑक्टोबर 2018 रोजी निधन झाले. दोन राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषवले एनडी तिवारी हे एकमेव मंत्री होते. ते तीन वेळा उत्तरप्रदेश आणि एक वेळा उत्तराखंडाचे मुख्यमंत्री होते. त्याशिवाय एनडी तिवारी यांनी आंधप्रदेशचे राज्यपाल पदही भूषवले आहे.