युतीच्या 235-240 जागा येतील, त्यात आमचेही 4-5 आमदार असतील : आठवले

| Updated on: Sep 05, 2019 | 9:55 PM

मुंबईतील वरळी येथे आयोजित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्याला (RPI Melava Ramdas Athavle) मुख्यमंत्र्यांसह विविध नेत्यांची उपस्थिती होती. या निवडणुकीत युती व्हावी अशी आपली इच्छा असल्याचं रामदास आठवले म्हणाले.

युतीच्या 235-240 जागा येतील, त्यात आमचेही 4-5 आमदार असतील : आठवले
Follow us on

मुंबई : शिवसेना आणि भाजप एकत्र लढले तर राज्यात 288 पैकी 235 ते 240 जागा येतील. त्यामध्ये आरपीआयचेही चार ते पाच आमदार असतील, असं वक्तव्य आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (RPI Melava Ramdas Athavle) यांनी केलं. मुंबईतील वरळी येथे आयोजित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्याला (RPI Melava Ramdas Athavle) मुख्यमंत्र्यांसह विविध नेत्यांची उपस्थिती होती. या निवडणुकीत युती व्हावी अशी आपली इच्छा असल्याचं रामदास आठवले म्हणाले.

शिवसेना आणि भाजप यांच्यातच अजून जागांचं वाटप झालेलं नाही. पण मित्रपक्षांना सन्मानपूर्वक जागा मिळतील, अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी 57 जागा मागितल्या. हरकत नाही जागा मागायला.. पण माहीत आहे तेवढया पण जागा मिळणार नाही, असंही आठवले म्हणाले.

शिवसेना आणि भाजपने एकत्र यावं ही माझी इच्छा आहे, असं रामदास आठवलेंनी मुख्यमंत्र्यांसमोर सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मला जवळ पाहायचंय. हे एकत्र आले तर 235 ते 240 जागा येतील आणि त्यात आमच्याही 4 ते 5 जागा असतील, असं आठवले म्हणाले.

यावेळी विधानसभेत आरपीआयचेही आमदार असतील : मुख्यमंत्री

पुन्हा एकदा राज्यात युतीचीच सत्ता येणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. महायुतीचं सरकार येणार याचा विश्वास आहे आणि यावेळी विधानसभेत आरपीआयचेही आमदार असतील याबाबत तुम्हाला आश्वस्त करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारवरही टीका केली. आघाडीच्या सरकारच्या काळात सुईएवढी जागा देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दिली नाही. इंदू मिलच्या जागेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसात जमिनीचा प्रश्न निकाली काढला, असं मुख्यमंत्री म्हणाले.

निवडणूक जवळ आली की काही पक्ष भाजप संविधान बदलणार असं सांगतात. पण त्यांना सांगावंसं वाटतं की ही रेकॉर्ड आता जुनी झाली. मोदी कुणाच्या फोटोला नाही, तर संविधानाला नमन करुन कामाची सुरुवात करतात. आमची संविधानावर श्रद्धा आहे, त्यामुळे त्यालाच कुराण आणि बायबल समजून काम करु. भारतात आरक्षण कुणीही संपवणार नाही ही काळ्या दगडावरील रेघ आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 काढल्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 370 ला विरोध करत संविधान सभेतून वॉक आऊट केलं होतं. 70 वर्षांनी हे कलम रद्द झालं. त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलेला निर्णय आज झाला आणि त्यांच्या विरोधाला न्याय मिळाला, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचं कौतुक केलं.

VIDEO : मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण भाषण