मुंबईः वादग्रस्त भूमिकांसाठी ख्यात असलेल्या केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) एका पोस्टची सरकारने तत्काळ दखल घ्यावी. तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) नेते सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली आहे. नववर्षानिमित्त तिने सोशल मीडियावर याविषयी भाष्य केलं होतं.
केतकी चितळेने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यापैकी एकाने तिला भीमा कोरेगाव शौर्यदिनाबद्दल विचारलं…
शौर्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली. यावर केतकी चितळेनं दिलेल्या उत्तरावरून तिच्याविरोधात राळ उठली आहे.
एका नेटकऱ्याने म्हटलं… तमाम भारतीयांना भीमा कोरेगाव शौर्य दिनी शुभेच्छा द्याल, असे वाटले होते. तुमच्याकडून आजचा दिवस दुर्लक्षित होणे अनपेक्षित आहे…
यावर केतकीने संतप्त प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, भीमा कोरेगाव म्हणजे तीच जागा जिथे ब्रिटिश सैन्यातील तुकडी पेशव्यांच्याविरोधात लढली? ब्रिटिश सरकारच्या बाजूने मराठा सैन्याविरुद्ध लढणाऱ्या लोकांना मी शुभेच्छा देण्याची तुम्ही अपेक्षा ठेवता म्हणजे एक तर तुम्हाला मी राष्ट्रद्रोही वाटते किंवा तुम्हाला खरा इतिहास माहिती नाही. यातील नेमके काय, असा सवाल तिने विचारलाय.
केतकीच्या या प्रतिक्रियेनंतर पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली आहे.
सचिन खरात म्हणाले, सतत केतकी चितळे वादग्रस्त पोस्ट करत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील पोस्टची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर दखल घ्यावी आणि तिच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी बिभत्स कपडे घालणाऱ्या उर्फी जावेदविरोधात भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार मोहीम उघडली आहे. यावरून सुषमा अंधारेंनी अमृता फडणवीस, कंगना राणावत आणि केतकी चितळे यांचेही फोटो ट्विट केले. कपड्यांवर बोलायचेच असेल तर यांच्यावरही भाष्य करा, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं.
विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांनाच टार्गेट करणं योग्य नाही, अशी भूमिका सुषमा अंधारे यांनी मांडली.