नाशिक : नाशिकचे माजी आमदार आणि भाजपवासी नेते वसंत गिते (Vasant Gite) यांच्या मिसळ पार्टीनंतर मनसेत गटबाजी विकोपाला गेली आहे. पक्षाचे आदेश झुगारुन पार्टीला हजर राहिलेल्या मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा इशारा प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम यांनी दिला आहे. पक्षांतराच्या चाचपणीसाठी गिते यांच्या काल (शुक्रवार एक जानेवारी) झालेल्या मिसळ पार्टीला मनसेचे अनेक नेते उपस्थित राहिले होते. (Ruckus in Nashik MNS over BJP Leader Vasant Gite Misal Party)
भाजपवासी वसंत गितेंच्या मिसळ पार्टीला हजेरी लावू नये, असे आदेश मनसेच्या नाशिक जिल्हाध्यक्षांनी काढले होते. पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना गितेंच्या पार्टीला न जाण्यास मनसेने फर्मावलं होतं. परंतु वसंत गिते हे पूर्वाश्रमीचे मनसेचे आमदार आहेत. त्यामुळे गितेंना सहानुभूती देण्यावरुन मनसेत दोन गट पडल्याचं चित्र आहे.
भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदावरुन उचलबांगडी करत कार्यकारिणी सदस्यपद दिल्याने वसंत गिते नाराज असल्याची चर्चा आहे. वसंत गिते यांनी नववर्षाच्या मुहूर्तावर समर्थकांसाठी मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं. ‘मिसळ डिप्लोमसी’च्या निमित्ताने ते दुसऱ्या पक्षात जाण्याची चाचपणी करत असल्याचं बोललं जातं. कार्यकर्ते, समर्थक यांच्याशी चर्चा करुन वसंत गिते पुढची दिशा ठरवणार असल्याची माहिती आहे.
वसंत गितेंसमोर सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पर्याय खुले आहेतच. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घरवापसी करण्याबाबतही ते विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वसंत गिते पक्षांतराचा मुहूर्त साधण्याची चिन्हं आहेत. (Ruckus in Nashik MNS over BJP Leader Vasant Gite Misal Party)
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीला सव्वा वर्ष असले, तरी राजकीय वातावरण आतापासूनच तापायला लागलं आहे. नाशिक महापालिकेत सत्ता आणि तीन आमदार अशी भाजपची मोठी ताकद आहे. परंतु महाविकास आघाडीने एकत्रित शड्डू ठोकल्याने भाजपच्या गोटातही अस्वस्थता पसरली आहे.
वसंत गिते यांनी नाशिकमधून मनसेच्या तिकीटावर आमदारकी भूषवली आहे. मात्र काही वर्षांपूर्वी मनसेची साथ सोडत त्यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. विधानसभा निवडणुकीवेळी वसंत गिते यांना काँग्रेसने ऑफर दिल्याचं बोललं जातं. परंतु, त्यांनी ती धुडकावली होती. आता त्यांच्यासमोर शिवसेना-राष्ट्रवादीचे पर्याय असले, तरी नाशकात मनसेला बळ देण्यासाठी गिते घरवापसीचा विचार करु शकतात. मात्र नाशिक मनसे जिल्हाध्यक्षांनी समर्थकांना अटकाव करत दारं बंद असल्याचेच संकेत एकप्रकारे दिले आहेत.
संबंधित बातम्या
भाजप नेते वसंत गितेंची समर्थकांना ‘मिसळ’ पार्टी, पक्षांतराचा ‘कट’ शिजण्याची चिन्हं
(Ruckus in Nashik MNS over BJP Leader Vasant Gite Misal Party)