पुणेः चिपळूण येथील भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला कुणी केला, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनी यावर प्रतिक्रिया देताना थेट हल्लेखोराचं नाव सांगितलंय. राणे आणि राणेसमर्थकांनी (Narayan Rane) हा भ्याड हल्ला केल्याचा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केलाय. पण असे भ्याड हल्ले करायला यांना लाजा वाटत नाही, हा भ्याड हल्ला आहे… आम्हाला उगाच चिडायला लावू नका, असा इशारा रुपाली ठोंबरे यांनी दिलाय.
नारायण राणे आणि त्यांच्या दोन पोरांनी आता आवरतं घ्यावं. खरंच यांना बाळासाहेब ठाकरे यांचा शाप लागलाय. इथले कर्म इथेच फेडावे लागतील, याची दक्षता त्यांनी घ्यावी, असा इशारा रुपाली ठोंबरे यांनी दिलाय.
भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी रात्री दगडफेक झाली. या आवारत काही स्टंप तसेच पेट्रोलने भरलेल्या बाटल्याही आढळल्या. नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचं म्हटलं जातंय. भास्कर जाधव सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. विविध ठिकाणी भाषणांमधून त्यांनी शिंदे-भाजप तसेच नारायण राणे पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली आहे.
मात्र ही टीका अत्यंत खालच्या पातळीवर केल्याचा आरोप राणे समर्थकांकडून करण्यात येतोय. नितेश राणे यांनीदेखील भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी प्रतिक्रिया दिली. तुम्ही एवढ्या खालच्या पातळीवर बोलत असाल तर कार्यकर्ते संतप्त होणारच, आम्ही त्यांना रोखू शकत नाहीत. राणे यांचा समर्थन करणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात असताना त्यांना हे सहन होणार नाही, असं वक्तव्य नितेश राणे यांनी टीव्ही 9 शी बोलताना केलं.
दरम्यान, भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्याचा महाराष्ट्रातून विविध ठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय. कोल्हापूरमध्ये या हल्ल्याविरोधात ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला.
असले प्रकार थांबवा अन्यथा राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिलाय.