मुंबई – “नीतिमत्ता आणि राजकारण (Politics) या दोन्ही वेगळया गोष्टी असून नीतिमत्तेचा निवडून येण्याशी काहीही संबंध नाही. सध्याच्या राजकारणातील या सत्यावर श्री. गडकरी (Nitin Gadkari) यांनी नेमके बोट ठेवले आहे. श्री. नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पक्के अनुयायी आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा पाया भक्कम आहे. समाजकारणासाठी गटारी राजकारण सोडण्याची प्रेरणा त्यांना नागपुरातूनच मिळत असावी. गडकरी बोलतात म्हणून निदान झाडा-पानांत थोडी तरी सळसळ होते, नाहीतर लोकशाहीचे सर्वच वृक्ष सध्या वठलेले दिसतात. गडकरींचा किल्ला अभेद्य राहावा ही लोकशाहीची गरज आहे! आजच्या सामना (Saamana) अग्रलेखात गडकरीची स्तुती करण्यात आली आहे.”
राष्ट्राच्या आकांक्षा जशा महाकाव्यात प्रकट व्हाव्यात तसे नाथ पैंच्या वक्तृत्वातून आमच्या सर्वांचे पडसाद उमटतात असे एकदा कवी वसंत बापट म्हणाले होते. अलीकडे नितीन गडकरी यांच्या अनेक वक्तव्यांतून लोकभावनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. गडकरी यांचे नागपूरचे भाषण सगळयांनाच विचार करायला लावणारे आहे. सध्या ‘राजकारण’ या शब्दाचा अर्थ समजून घ्यायची वेळ आली आहे. महात्मा गांधी यांच्या काळात राजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते. आता मात्र राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झाले आहे. त्यामुळे राजकारण कधी सोडतो असे वाटायला लागले आहे,” अशी निरवानिरवीची भाषा श्री. गडकरी यांनी करावी हे वेदनादायी आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात गडकरी गुदमरतआहेत.
“त्यांना जे चालले आहे ते असहय होत आहे, पण करायचे काय? या प्रश्नाने सतावले आहे. माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे अधिक महत्त्वाचे आहे. काही माणसे आयुष्यभर जीवनमूल्यांकरिता संघर्ष करतात, मात्र ती राजकारणात शस्वी ठरतातच असे नव्हे.
नीतिमत्ता आणि राजकारण या दोन्ही वेगळ्या गोष्टी असून नीतिमत्तेचा निवडून येण्याशी काहीही संबंध नाही. सध्याच्या राजकारणातील या सत्यावर श्री. गडकरी यांनी नेमके बोट ठेवले आहे. गडकरी हे स्वता:ला सध्याच्या राजकारणात ‘फिट’ मानत नाहीत. भोवती गारद्यांचा गराडा आहे व हाती अनीतीच्या तलवारींचा खणखणाट सुरू आहे. त्यामुळे अस्वस्थ गडकरींनी नागपुरात मन मोकळे केले असे दिसते. सध्याचे राजकारण हे विचारांचे, नीतिमत्तेचे राहिलेले नाही. श्री. गडकरी यांनी गांधी काळातील राजकारणाचा उल्लेख केला, पण भारतीय जनता पक्षाला गांधी विचार मान्य नाहीत. तरीही गडकरी गांधींचा संदर्भ देतात हे महत्त्वाचे. पूर्वी समाजकारणासाठी लोक राजकारणात येत होते, आज तसे नाही” असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.