मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी ‘राष्ट्रपिता’ आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Swatantryaveer Savarkar) मुद्द्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काही दिवसांआधी केलेल्या विधानाचाही यात संदर्भ देण्यात आला आहे. भाजपने सावरकरांचा लढा उपेक्षित ठेवला. नरेंद्र मोदी नव्हे, स्वातंत्र्यवीर सावरकरच राष्ट्रपिता असं भाजपवाले का बोलत नाहीत?, असं म्हणत आजच्या सामनातून (Saamana Editoial) भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
सौ. अमृता फडणवीस हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे व त्यांची मते त्या मांडत असतात. आता त्यांनी एक मत मांडले, “आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत!” सौ. फडणवीस यांचे स्वतंत्र विचार असू शकतात व एक नागरिक म्हणून त्यांना आपली मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण सौ. फडणवीस यांनी मांडलेल्या विचारांशी त्यांचा पक्ष सहमत आहे काय?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
स्वातंत्र्य लढ्यात तुमचे कुत्रेही मेले नाही. तुम्ही आमच्या बलिदानावर काय बोलणार? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे हे जळजळीत सवाल भाजपला अस्वस्थ करीत आहेत. तर दुसऱ्या बाजूला श्री. नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता असल्याचे सौ. अमृता फडणवीस यांनी जाहीर केले. नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतला होता?, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.
महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला. दांडी यात्रेने देश जागा केला. त्या यात्रेतही आजच्या दिल्लीतील राज्यकर्त्यांचा वंश नव्हता. आता राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा जोरात निघाली. ती दिल्लीच्या सीमेवर पोहोचली तेव्हा कोरोनाचे भय निर्माण करून ती रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे.
देशाच्या राजधानीत राहुल गांधींबरोबर लाखो लोक राष्ट्रीय ऐक्यासाठी चालत आहेत. हे चित्र जगात पोहोचेल याचे भय भाजपास वाटते. राष्ट्रपिता महात्मा गांधी निर्भय होते. मग नव्या भारताच्या नव्या राष्ट्रपित्यांना विरोधकांचे भय का वाटावे? याचे कारण एकच, स्वातंत्र्यासाठी एकही लाठी न खाणाऱ्यांच्या हाती आज देशाची सूत्रे आहेत. त्यांना लढणाऱ्यांचे व सत्य बोलणाऱ्यांचे भय वाटते. हे किती काळ चालायचे?, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.