मुंबई : अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेच्या युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. 2 जुलैला दुपारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. बुलढाण्यात झालेल्या बस अपघाताचा दाखला हे तर मुर्दाडांचं राज्य आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
‘एमएसआरडीसी’ कंपनीने हा मार्ग बांधला व हे खाते गेली अनेक वर्षे एकनाथ शिंदे सांभाळत आहेत. त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले, पण हे खाते त्यांनी स्वतःपाशीच ठेवले. कारण त्यात राज्याचे सगळय़ात मोठे अर्थकारण आहे. त्याच अर्थकारणातून समृद्धीवर बळी जात आहेत काय? महाराष्ट्रात एक संवेदनाहीन सरकार सत्तेवर आहे. समृद्धी महामार्गावरील पेटलेली बस आणि त्यातील होरपळलेल्या प्रवाशांच्या किंकाळय़ा यांना काय अस्वस्थ करणार? तिकडे निरपराध्यांची प्रेते जळत होती व इकडे भाजप, मिंधे गट व अजित पवारांचा गट शपथविधी सोहळ्यात दंग होता. मुर्दाडांचे राज्य यालाच म्हणतात.
महाराष्ट्रातला राजकीय गदारोळ संपलेला नाही, पण त्या गदारोळात समृद्धी महामार्गावर होरपळलेल्या जिवांचा आकांत आणि त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश विरून जाऊ नये. महाराष्ट्राच्या राजकारणास एक संस्कृती आणि परंपरा आहे. ते राजकारण इतके निर्दयी का झाले? समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या चिता जळत असताना मुंबईच्या राजभवनात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला.
पेटलेल्या चिता व आक्रोशाची पर्वा न करता राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सुरू होता. एकमेकांना पेढे भरवले जात होते. फटाके फोडून गळाभेटी घेतल्या जात होत्या. महाराष्ट्रातील मृत्यूचे तांडव व पेटलेल्या चितांची दखल न घेता हे प्रकार महाराष्ट्रात सुरू आहेत.
कालच्या राजकीय उलथापालथीत व उखाळ्या पाखाळ्यात समृद्धीवरील ‘हत्या’ विसरल्या जाऊ नयेत. बुलढाण्याजवळ याच महामार्गावर शनिवारी भीषण बस अपघात होऊन 25 जणांचा जळून कोळसा झाला. समृद्धी महामार्ग सुरू होऊन 203 दिवस झाले. या काळात 450 अपघात झाले व त्यात साधारण शंभरच्या आसपास लोकांना जीव गमवावे लागले आहेत.
समृद्धी महामार्ग हे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते. नागपूर मुंबईच्या जवळ आणावे. त्यातून विदर्भाचा विकास होईल, असे श्री. फडणवीस यांचे मत होते. त्यामुळे मुख्यमंत्री असताना व नंतरही फडणवीस यांनी त्यांची महत्त्वाकांक्षी योजना पुढे नेली. तोच समृद्धी महामार्ग आता रोज माणसे खात आहे. बकासुराप्रमाणे बळी घेत आहे.
दिल्लीपासून उत्तरेतला ‘यमुना एक्सप्रेस वे’ असेल नाही तर इतर महामार्ग, मग अपघातांचे प्रमाण आपल्याच समृद्धी महामार्गावर जास्त का? ‘एमएसआरडीसी’ कंपनीने हा मार्ग बांधला व हे खाते गेली अनेक वर्षे एकनाथ शिंदे सांभाळत आहेत. त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले, पण हे खाते त्यांनी स्वतःपाशीच ठेवले. कारण त्यात राज्याचे सगळय़ात मोठे अर्थकारण आहे. त्याच अर्थकारणातून समृद्धीवर बळी जात आहेत काय? महाराष्ट्रात एक संवेदनाहीन सरकार सत्तेवर आहे.