मुंबई | 08 ऑगस्ट 2023 : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपच्या मनसुब्यांवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. राज्यातील धनिक व शेठ मंडळांचे सावटही दूर होईल . व्यापारी बहुमत विकत घेतात. पण जनतेस सामोरे जात नाहीत . हे जुलमाचे व्यापारी राज्य लवकरच उलथे पडेल, असं म्हणत सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.
महाराष्ट्र हे छत्रपती शिवरायांचे राज्य आहे. डॉ. आंबेडकर याच मातीतले. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी येथे कायद्याचेच राज्य शेवटपर्यंत राहील. पोर्तुगीज, ईस्ट इंडियाचे व्यापारी आले-गेले तसे सध्याचे धनिक व शेठ मंडळांचे सावटही दूर होईल . फडणवीस म्हणतात की , श्री . अमित शहा यांना महाराष्ट्र चांगला कळतो . बहुधा म्हणूनच ते मुंबई व महाराष्ट्रात निवडणुका घ्यायला धजावत नाहीत . व्यापारी बहुमत विकत घेतात , पण जनतेस सामोरे जात नाहीत . हे जुलमाचे व्यापारी राज्य लवकरच उलथे पडेल . देशात तसेच वारे वाहत आहेत.
पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्री शहा यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. फडणवीस यांनी इतके केले. मग मुख्यमंत्री मिंधे आणि अजित पवार तरी कसे मागे राहतील? त्यांचीही गाडी सुसाट सुटली. श्री. शहा यांचा जन्म मुंबईतला, शहा यांनी मुंबईत व्यापार केला आहे, कारखाना चालवला आहे, त्यांना महाराष्ट्र चांगला कळतो, असे प्रशस्तीपत्र फडणवीसांनी द्यावे यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही.
मोदी-शहा यांच्या काळात महाराष्ट्रातील मोठमेठे उद्योग, कार्यालये त्यांनी हलवून गुजरातला नेली. मुंबईत जन्म घेतल्याचे असे पांग ते फेडत आहेत काय? क्रिकेट ही मुंबईची ओळख. ते क्रिकेटही त्यांनी पद्धतशीरपणे गुजरातेत पळवले. शहा यांना महाराष्ट्राचा पाया खतम करायचा आहे.
मऱ्हाटी राज्याला गुलाम करायचे आहे. म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेली शिवसेना तोडली व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकडे करून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा गळा घोटण्याचा प्रयत्न चालवला आहे. हे सर्व घडवून आणण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व ओवाळून टाकलेल्या भ्रष्ट लोकांची ‘मोट’ बांधली व राज्याची सूत्रे त्यांच्या हाती दिली. सत्तेवर सर्व मिंधे, पण बादशाही गुजरातकडे असे जे चित्र दिसत आहे ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानास ठेच पोहोचविणारे आहे.
गृहमंत्री शहांना भूमिका घ्यायला लावा. तर त्या जावयांची ओवाळणी करू. डहाणूचे आमदार विनोद निकोलस यांनी एक गंभीर मुद्दा समोर आणला आहे. गुजरातने डहाणूच्या सीमेत घुसून दोन किलोमीटरचा भूभाग कब्जात घेतला. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यावर काय भूमिका घेणार आहेत? अमित शहा हे मुंबई महापालिकेच्या निवडणुका घ्यायला तयार नाहीत.
प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईची लूट करीत आहेत. मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असे भाजपला वाटते. त्यामुळे भाजप कोंबडीच मारून खात आहे. कारण फडणवीस म्हणतात ते खरे आहे. श्री. शहा यांना मुंबई चांगली कळते. शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांना सर्व कळते, पण मणिपुरात नेमके काय घडते आहे व हिंसाचार कसा थांबवायचा ते कळत नाही हे आश्चर्यच म्हणायला हवे.