मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आमच्यासोबत आले कारण ते जाणतात की बाळासाहेबांचं खरं स्वप्न काय आहे हे ते. बाळासाहेबांनी कायम हिंदुत्वाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्याचं तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिंदेगट आमच्यासोबत आला, असं भाजपचे नेते एव्हाना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वारंवार सांगताना दिसतात. त्याला आजच्या सामनाच्या अग्रलेखात परखड शब्दात उत्तर देण्यात आलं आहे. बाळासाहेबांचं (Balasaheb Thackeray) खरं स्वप्न सांगताना भाजपला वाजपेयी आणि अडवाणी यांची आठवण करून देण्यात आली आहे. “बाळासाहेबांचे स्वप्न वगैरे ही भाजपच्या तोंडची भाषा हे कारस्थान आहे. हे लोक अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी या मायबापांना विसरले ते बाळासाहेबांचे स्वप्न कसले साकार करणार? शिवसेना म्हणजे जनतेची शक्ती आहे. ही शक्ती दुर्बल होऊ नये म्हणून आम्ही तळमळतो. हेच बाळासाहेबांचे स्वप्न आहे. शिवरायांचा महाराष्ट्र आहे असे तोंडाने बोलायचे व कृती औरंगजेबाची करायची. हे धंदे चालणार नाहीत. मुंबई गिळायची हे तुमचे स्वप्न शिवसेना पूर्ण होऊ देणार नाही. हेच बाळासाहेबांचे स्वप्न ! घोडा मैदान लांब नाही. तोपर्यंत शिंदे गटाकडून तेल मालीश करून घ्या!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
सामनातून सवालांची सरबत्ती!
महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस गटाची सत्ता आली. पण राज्यात कायदेशीर सरकार स्थापन झाले काय? हा प्रश्न जनतेला पडू लागला आहे. सरकारच्या नावाखाली थिल्लरपणाच चालला आहे. मुख्यमंत्री म्हणून श्री. फडणवीस जितके प्रगल्भ, शहाणे होते त्या प्रतिष्ठेचे शिंदे गटाबरोबर मातेरे झालेले दिसत आहे. राज्याच्या प्रश्नांवर ते बोलत नाहीत. त्यांचे बोलणे फक्त शिवसेनेवर आहे. शिवसेना फोडूनही त्यांच्या मनात शिवसेनेचे भय आहे. त्यांच्या मानगुटीवर शिवसेना बसलीच आहे. फडणवीस मुंबईतील दहीहंड्या फोडत फिरले. त्यांनी शिवसेनेशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी ‘मुंबईवर 26/11 प्रमाणे दहशतवादी हल्ला करू, मुंबई उद्ध्वस्त करू’ अशा धमक्या दहशतवाद्यांकडून आल्याने मुंबईसह महाराष्ट्र भयग्रस्त झाला. दहीहंडीचा आनंदोत्सव कोणाला नको ? सगळ्यांनाच हवाय. पण सर सलामत तो पगड़ी पचास! दोन वर्षे उत्सव बंदी होती ती काही मागील सरकारला हौस होती म्हणून नाही. कोरोनामुळे मोदी साहेबांनीच निर्बंध घातले होते ना? आता म्हणे आमच्या राज्यात उत्सव बंदी नाही. अहो देवेंद्रजी, राज्याचे आरोग्य ठिकठाक करून, जवळजवळ कोरोनामुक्त करूनच राज्य तुमच्याकडे सोपवले. पण गेल्या दोन दिवसांच्या उत्सवानंतरचे काय चित्र आहे ? दहीहंडीच्या एकाच दिवशी कोरोनाचे 1500 रुग्ण वाढले आहेत. संसर्ग वाढू लागला आहे. मुंबईत साधारण 6000 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. यास कसला उत्सव म्हणावा ? हिवताप, स्वाईन फ्लूने सर्वत्र थैमान घातलं आहे. विदर्भात हिवतापाचे बळी जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात स्वाईन फ्लूचे 17 बळी गेले आणि तुम्हाला पडली आहे मुंबई महानगरपालिकेची! फडणवीसांनी दोन दिवसांपूर्वी ‘बाळासाहेबांसाठी भाजपास मते द्या!’ असे आवाहन केले. त्यावर आम्ही म्हणतो, ‘बाळासाहेबांच्या नावावर कसली मते मागता? तुमचं ते मोदी पर्व, मोदी वादळ ओसरलं काय?” मुंबई महानगरपालिकेत या मंडळींना शिवसेनेचा पराभव करायचा आहे व शिवसेनेचा पराभव करण्यासाठी ते बाळासाहेबांच्याच नावाचा वापर करीत आहेत.
फडणवीस वगैरे पुढारी बाळासाहेबांचे स्वप्न उराशी कवटाळून बसले आहेत. 2014 मध्ये शिवसेनेशी ‘युती’ तोडताना या महामंडलेश्वरांना बाळासाहेब आठवले नाहीत. 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेला शब्द तोडतानाही त्यांना बाळासाहेबांच्या स्वप्नांचे स्मरण झाले नाही. आता मोठे आले बाळासाहेबांचे स्वप्न साकार करायला ! फडणवीसांचे बोल हे लबाड कोल्ह्याचे आवतण आहे. मुंबई-ठाणेकरांनी सावध राहायला हवे. राज्यात फक्त थिल्लरपणा सुरू आहे. सत्य फक्त हेच आहे की, मुंबईतून मराठी एकजूट संपवायची आहे व त्यासाठी शिवसेनेवर घाव आणि घाव घालायचे आहेत… बाळासाहेबांचे स्वप्न वगैरे ही भाजपच्या तोंडची भाषा हे कारस्थान आहे. हे लोक अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी या मायबापांना विसरले ते बाळासाहेबांचे स्वप्न कसले साकार करणार? जगात उगवत्या सूर्याला अर्ध्य देणारे पुष्कळ लोक असतात. तोंडपूजा माणसांची जगात कधीच उणीव नसते. पण शिवसेना म्हणजे जनतेची शक्ती आहे. ही शक्ती दुर्बल होऊ नये म्हणून आम्ही तळमळतो. हेच बाळासाहेबांचे स्वप्न आहे.