मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) अमित शाह यांना चक्क बोलत राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. “अमित शाह आपण असंच बोलत राहा, मऱ्हाठा नक्की उठेल!”, असं म्हणत अमित शाह यांना बोलत राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. “शिवसेनेला गाडण्याची व उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्याची भाषा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केली. आता मुंबईवर ताबा मिळवायचाच. आता नाही तर कधीच नाही, असेही ते म्हणाले. शिवसेना फोडली कशासाठी? त्या विषालाच यानिमित्ताने उकळी फुटली. भाजपमध्ये एखादा चिंतामणराव देशमुख निर्माण होणे नाही, पण शिंदे गटाने तर सुंताच करून घेतली! मात्र अमित शाह यांनी हे असे बोलत राहावे. मऱ्हाठा नक्की उठेल!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गणपती दर्शनासाठी मुंबईत आले व त्यांनी शिवसेना द्वेषाचे प्रदर्शन केले. ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांसमोर त्यांनी बंद दाराआड भाषण केले. ते सार्वजनिक झाले. विषाला उकळी फुटावी असे त्यांचे वक्तव्य आहे.. मुख्य म्हणजे त्यांचे भाषण हे कृतघ्नतेचे टोक आहे, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.
अमित शहा व भाजपचे ‘मिशन मुंबई’ काय आहे त्याचा भयंकर चेहरा उघडा पडला. अमित शहा व त्यांच्या लोकांनी अशा प्रकारची भाषणे पुनःपुन्हा करीत राहिली पाहिजेत. त्यातूनच जनमनाचा उद्रेक होईल. शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि राज ठाकरे यांना चुचकारून त्यांनी मुंबईवर नियंत्रण मिळविण्याचे ठरवले आहे, असं सामनातून अमित शाह आणि भाजपच्या इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.
“नव्या दमाचे वीर, योद्धे निर्माण होतील. स्वतःस शिंदे गट म्हणवून घेणाऱ्यांनी तर स्वाभिमानाची सुंताच करून घेतली आहे! ते निद्रिस्त आहेत. पण ‘मऱ्हाठा’ नक्की उठेल! , असं सामनात म्हणण्यात आलं आहे.