मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर काल सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. यात दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थिगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. मात्र, शिवसेनेची स्थगिती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे शिंदेगटाला दिलासा मिळालाय. तर उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा झटका आहे. कालच्या सुनावणीनंतर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) पुन्हा एकदा ‘कमळाबाई’ भाजपवर टीका करण्यात आली आहे.
“मुंबईवरील संकटाचा प्रत्येक घाव शिवसेनेने छातीवर झेलला आहे. शिवसेनेचा दांडिया अस्सल मर्दानीच असतो. शिवसेनेच्या शाखा म्हणजे चोवीस तास लोकांसाठी उघडी असलेली जनमंदिरेच आहेत . तितकीच ती न्यायाची मंदिरे आहेत . शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची केलेली ही रचना आजही मजबूत पायावर उभी आहे . ती कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही”, असं सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.
“शिवसेना शिल्लक आहे म्हणून मऱ्हाठी शिल्लक आहे . हिंदुत्व बचावले आहे . शिवसेनेवर पाठीमागून घातकी वार करणाऱ्यांना याच शिवसेनेने स्वाभिमानाने जगायला शिकविले . गर्वाने ‘ मराठी ‘ पणाची कवचकुंडले दिली , पण आज तेच लोक शिवसेनेवर उलटले आहेत . स्वकीयांशी लढणे हे महाराष्ट्राचे व मराठय़ांचे दुर्भाग्य काय आजचे आहे?”, असं म्हणत शिंदेगटावर टीका करण्यात आली आहे.
“मुंबई महापालिकेवरील ‘भगवा झेंडा’ खाली खेचण्यासाठी भाजपच्या कमळाबाई अनेक युक्त्या आणि क्लृप्त्या करीत आहे. एका बाजूला मराठी लोकांत फूट पाडायची तर दुसऱ्या बाजूला शाकाहार, मांसाहार असे विषय घेऊन इतर प्रांतीय, समाजाला वेगळे करायचे असे त्यांचे एकंदरीत धोरण आहे”, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.