मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक (BritainPrime Minister Rishi Sunak) यांचं कौतुक करण्यात आलं आहे. तसंच त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा असल्याचंही बोलून दाखवण्यात आलेलं आहे. “आज ब्रिटन आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडला आहे. त्यामुळे नवनिर्वाचित पंतप्रधान सुनक यांच्यासमोर आव्हानांचे विशाल पर्वत उभे आहेत. आर्थिक संकटांवर मात करून हा हिंदुस्थानी ‘ऋषी’ ब्रिटनला पुन्हा एकदा वैभवाच्या यशोशिखरावर कसे घेऊन जातो, हे पाहणे कुतूहलाचे ठरेल”, असं आजच्या सामनातून (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.
ब्रिटिशांनी आपल्याकडे पाऊल ठेवण्यापूर्वी हिंदुस्थानात सोन्याचा धूर निघत होता असे म्हणतात. ते वैभव ब्रिटिशांनीच लुटून नेले. आता ब्रिटनमध्ये ‘सोन्याचा धूर’ निघावा याची जबाबदारी नियतीने एका हिंदुस्थानी ‘ऋषी’वर सोपवावी हा एक विलक्षण योगायोग म्हणावा लागेल! सोन्याचा धूर ही अतिशयोक्ती असली तरी ब्रिटनमध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याच्या कार्यात ‘ऋषी’राज यशस्वी होवो आणि एका हिंदुस्थानीचे नाव ब्रिटिशांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कायमचे कोरले जावे, अशीच सद्भावना आज प्रत्येक हिंदुस्थानी मनोमन बाळगून आहे, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.
ज्या ब्रिटिशांनी हिंदुस्थानवर दीडशे वर्षे राज्य केले, त्या ब्रिटनच्या सत्तेची सूत्रे भविष्यात कधी काळी हिंदुस्थानी मूळ असलेल्या व्यक्तीच्या हाती येतील, याचा स्वातंत्र्यपूर्व काळात कुणी स्वप्नातही विचार केला नसता. तथापि हे प्रत्यक्षात घडले हा काळाचा मोठाच महिमा म्हणावा लागेल. मूळ हिंदुस्थानी वंशाचे असणारे ब्रिटनच्या हुजूर पक्षाचे खासदार ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. ज्या ब्रिटिशांनी हिंदुस्थानचे प्रचंड शोषण करून येथील साऱ्या साधनसंपत्तीची दीडशे वर्षे लूट केली, त्याच इंग्रजांच्या देशात वंशाने हिंदुस्थानी असलेली एक व्यक्ती आज पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर स्थानापन्न झाली आहे. ऋषी सुनक यांच्या रूपाने ब्रिटनच्या पंतप्रधानपदी एका हिंदुस्थानी व्यक्तीने आरूढ होणे हा ब्रिटिशांवर काळाने उगवलेला सूड वगैरे आहे, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.