मुंबई : भाजप नेते आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Statement) यांनी शिक्षणसंस्थांच्या उभारणीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूने टीका करण्यात आली. त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली. सामनाच्या अग्रलेखातूनही टीका करण्यात आली आहे. “भारतीय जनता पक्षाचे नेते इतक्या बेतालपणे का बोलत आहेत? कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांचे तळतळाट व शाप त्यांना लागलेत का?”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.
“भारतीय जनता पक्षाचे नेते इतक्या बेतालपणे का बोलत आहेत? कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांचे तळतळाट व शाप त्यांना लागलेत का? नपेक्षा शिकल्या-सवरलेल्या माणसांच्या डोक्यावर असा परिणाम झालाच नसता.चंद्रकांत पाटील हे तर राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. शिक्षणमंत्री म्हणून त्यांना भिकेचे डोहाळे लागले आहेत व तेच त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहे”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर भाष्य करण्यात आलं आहे.
“चंद्रकांत पाटील यांनी आता दिलगिरी व्यक्त करून माघार घेतली. तरीही शाईफेकीचा हल्ला त्यांच्यावर झाला. महाराष्ट्रात महापुरुषांच्या बदनामीचा ‘जिहाद’ सरकारने पुकारला आहे काय? ‘लव्ह जिहाद’विरुद्ध कायदा महाराष्ट्र सरकार बनवत आहे. त्याआधी शिवराय, फुले, आंबेडकरांच्या विरोधात वळवळणाऱ्या जिभांना आवर घालणारा कायदा करा!”, अशी मागणी सामनातून करण्यात आली आहे.
“महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी येथे शाईफेक करण्यात आली. अशा घटनांचे समर्थन करता येणार नाही, पण शेवटी जे पेरले तेच उगवताना दिसत आहे. पाटील यांनी डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासंदर्भात एक विधान केले. त्यातून हा शाईफेकीचा स्फोट झाला”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.