मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राजभवनाची रोज अप्रतिष्ठाच सुरु आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पाठवलेले पत्र हा तर अगोचरपणाच म्हणायला हवा. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘एकच’ मारला, पण सॉलीड मारला! असा खोचक टोला शिवसेनेनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे. (Saamana Editorial On CM uddhav thackeray and Governor Bhagat singh Letter war)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे शिवतेज पाहून मंदिरांतील देवांनीही आनंदाने घंटानाद केला असेल. हा घंटानाद पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहोचलाच असेल, तर ते राजभवनाची प्रतिष्ठा राखण्यासाठी राज्यपालांना माघारी बोलवतील. बाकी जास्त काय बोलायचं? राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसे वागू नये ते भगतसिंह कोश्यारी यांनी दाखवून दिले आहे. श्रीमान कोश्यारी हे कधीकाळी संघाचे प्रचारक किंवा भाजपचे नेते असतीलही; पण आज ते महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याचे राज्यपाल आहेत याचा त्यांना सोयीस्कररीत्या विसर पडलेला दिसतोय. महाराष्ट्रातील भाजप नेते रोज सकाळीच सरकारच्या बदनामीची मोहीम सुरू करतात हे समजण्यासारखे आहे; पण त्या मोहिमेचा चिखल राज्यपालांनी आपल्या अंगावर का उडवून घ्यावा? असा प्रश्नही शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे.
भाजपचं दुखणं किमान पुढची चार वर्ष राहणारच
भाजपने महाराष्ट्रात सत्ता गमावली ही वेदना मोठी आहे; पण त्यांच्या दुखणाऱ्या पोटावर राज्यपालांनी सारखा लेप लावण्यात अर्थ नाही. हे दुखणं किमान पुढची चार वर्षे राहणारच आहे. पण भाजपचे पोट दुखतेय म्हणून घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात हे जरा गंभीर आहे. पण त्या बाळंतकळांवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपचार केले आहेत. राज्यपाल पदावरील बुजुर्ग व्यक्तीने आपल्या मर्यादा सोडून वागले तर काय होते, त्याचा धडा देशातील सर्वच राज्यपालांनी घेतला असेल, असेही शिवसेनेनं यात म्हटलं आहे.
राज्यात मंदिरे उघडा यासाठी भाजपने आंदोलन सुरू केले. त्या राजकीय आंदोलनात राज्यपालांनी सहभागी व्हायचे तसे कारण नव्हते. हे आंदोलन सुरु असल्याचे टायमिंग साधत माननीय राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले. ते पत्र मुख्यमंत्र्यांच्या हाती पोहोचण्याच्या प्रवासातच वृत्तपत्रांकडे पोहोचले. राज्यात बार, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. मग प्रार्थना स्थळे बंद का? मंदिरे बंद ठेवण्याचे दैवी संकेत आपणास मिळत आहेत का? की तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात? असा सवाल राज्यपालांनी विचारला.
त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या धोतरालाच हात घातला व राजभवन गदागदा हलवले अशी भाषा आम्ही वापरणे असंसदीय ठरेल; पण मुख्यमंत्र्यांनी खास ठाकरी शैलीत राज्यपालांना खरमरीत उत्तर दिले. माझ्या हिंदुत्ववादाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही.’ अशा पद्धतीने मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक लोहारकी देत महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, बाणेदारपणा काय असतो ते दाखवून दिले.
“इथे बैल नसून वाघ आहे हे ते कसे विसरले?”
राज्यपालांनी या प्रकरणात आ बैल मुझे मार असेच वर्तन केले. पण इथे बैल नसून ‘वाघ’ आहे हे ते कसे विसरले? मुख्य म्हणजे या सर्व ‘धुलाई’ प्रकरणात भाजपचं वस्त्र्हरण झाले. राज्यपालांचा वापर करून महाराष्ट्र सरकारवर हल्ले करणे त्यांना महागात पडले. हे सर्व प्रकरण आपल्यावरच अशा पद्धतीने उलटवले जाईल. तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागेल याची कल्पनाही त्यांनी केली नसेल. या प्रकरणात भाजप व त्यांनी नेमलेले राज्यपाल इतके उघडे पडले आहेत की श्रीकृष्णाने वस्त्र पुरविली तरी त्यांची अब्रू वाचणार नाही, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.
मंदिरे उघडण्यावरून महाराष्ट्र सरकारला विचारणा करणारे राज्यपाल कोश्यारी गोव्यातील भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना तोच सवाल का करीत नाहीत? हिंदुत्वाचा अपमान करणाऱया, जेथे राजभवन आहे त्या मुंबईस पाकिस्तान ‘बाबर सेना’ म्हणणाऱ्या एका चवचाल नटीचे आगत-स्वागत करताना राजभवनात हिंदुत्व ओशाळून पडले याची चिंता राज्यपालांनी बाळगली नाही, हे का? असे प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केला आहे. (Saamana Editorial On CM uddhav thackeray and Governor Bhagat singh Letter war)
संबंधित बातम्या :
ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, जलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत चौकशी
मुंबई दरवर्षी कशी तुंबते? गडकरींचं उद्धव ठाकरेंसह पवारांना पत्र, नियोजनाचा सल्ला