“पोट निवडणुकीच्या व्यूहरचनेत, कटकारस्थानात खोके सरकार अडकून पडलंय”, सामनातून टीकास्त्र

| Updated on: Oct 15, 2022 | 8:56 AM

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सध्या सातत्याने पडणारा पाऊस, शेतकऱ्यांचं होणारं नुकसान, सरकारी मदत या सगळ्या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आहे.

पोट निवडणुकीच्या व्यूहरचनेत, कटकारस्थानात खोके सरकार अडकून पडलंय, सामनातून टीकास्त्र
Follow us on

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सध्या सातत्याने पडणारा पाऊस, शेतकऱ्यांचं होणारं नुकसान, सरकारी मदत या सगळ्या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. तसंच या मुद्द्यांच्या आधारे शिंदे-फडणवीस सरकारवर (Eknath Shinde) टीका करण्यात आली आहे. “पोटनिवडणुकीच्या व्यूहरचनेत आणि कटकारस्थानात अडकून पडलेल्या ‘खोके’ सरकारला शेतकऱ्यांची ही दैना दिसेल काय?”, असं म्हणत शिंदे सरकारच्या कामावर सामनातून (Saamana Editorial) प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

“आधी मान्सूनला विलंब झाला म्हणून दुबार पेरणीवर खर्च करावा लागला. त्यानंतर ढगफुटीसारखा पाऊस होऊन अनेक वर्षे खपून संगोपन केलेली शेती पुराच्या पाण्याने खरवडून नेली.त्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तेंडाशी आलेला उरलासुरला घासही हिरावून घेतला. पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई कुठल्याही परिस्थितीत पोळ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू अशी गर्जना राज्यातील ‘मिंधे’ सरकारने केली होती. पोळा होऊन दीड महिना झाला तरी अजून कागदी घोडेच नाचवले जात आहेत”, असं आजच्या सामनात म्हणण्यात आलं आहे.

सुगीचा हंगाम सुरू झाला असतानाच राज्यभर सर्वत्रच ढगफुटीसारखा पाऊस सुरू झाला आणि पुन्हा एकदा होत्याचे नव्हते झाले. राज्यात यंदा सर्वाधिक पेरा झाला तो सोयाबीनचा. मात्र सोयाबीनचे हेच पीक आता पुरते नष्ट झाले आहे. परतीचा पाऊस एरवी रब्बी हंगामासाठी तसा उपयुक्त ठरत असतो. पण यंदा तो विध्वंसक बनून आला. परतीच्या सरी एक-दोन दिवस कोसळतील आणि पाऊस निरोप घेईल असे वाटत होते, मात्र निसर्गाच्या लहरीपणाने कहरच केला. सलग दुसऱ्या आठवडय़ातही सातत्याने पाऊस सुरूच आहे. पुन्हा पावसाचे थैमानही इतके राक्षसी आहे की शेतांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे, असं आजच्या सामनात म्हणण्यात आलं आहे.

तणनाशक आणि मजुरीवरही दरवर्षीपेक्षा दुपटीहून अधिक खर्च शेतकऱ्यांना करावा लागतोय. त्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तेंडाशी आलेला उरलासुरला घासही हिरावून घेतला. मूग, उडीद गेले आणि ज्या पिकांवर सर्वाधिक भिस्त होती ते सोयाबीन व कापूसही हातचे गेले. आता वर्षभराचा शेतीचा खर्च कसा करायचा आणि जगायचं कसं, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.