मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीवरून शिंदे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. “सत्तांतरातून राज्यात कोणाचे खिसे किती गरम झाले, हे आता महाराष्ट्रातील जनतेपासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची दिवाळी जोरात झाली असली तरी जनतेचे काय ? हा प्रश्न कायमच आहे . महागाई , बेरोजगारी , आर्थिक मंदीचे सावट , बिघडलेले अर्थचक्र यामुळे सामान्य जनता आणि अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा आज अंधारात चाचपडत आहे . अर्थात राज्यातील मिंधे सरकार दिवाळी संपण्यापूर्वी जनतेला किमान दिलासा देईल , अशी अपेक्षा करणे व्यर्थच आहे”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.
बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस का वाढतेय असे एक ना अनेक प्रश्न जनतेच्या मनात धुमसत आहेत. या फटाक्यांची वात जेव्हा पेटेल तेव्हा सरकारच्या खुर्चीखाली धमाका झाल्याशिवाय राहणार नाही. रोजची आव्हाने व सततच्या धबडग्यातून मनाला उभारी देणारा दिवाळीचा सण सर्वांनाच हवाहवासा वाटतो. मात्र, दिवाळीचा हा सण दणक्यात साजरा होत असतानाच राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर जे ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे, त्या चिंताक्रांत शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर कसा करता येईल याचा विचार सरकारने करायला हवा, असं म्हणत शिंदेला शेतकऱ्यांना मदतीचं आवाहन केलं आहे.
महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदीचे सावट, बिघडलेले अर्थचक्र यामुळे सामान्य जनता आणि अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा आज अंधारात चाचपडत आहे. ओला दुष्काळ जाहीर करून आणि हेक्टरी किमान 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई देऊन सरकारने शेतकऱ्यांच्या आयुष्यात प्रकाशकिरणांची थोडीशी तरी तिरीप टाकायलाच हवी. अर्थात राज्यातील मिंधे सरकार दिवाळी संपण्यापूर्वी जनतेला किमान दिलासा देईल, अशी अपेक्षा करणे व्यर्थच आहे, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.