मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्यावर टीका करण्यात आली आहे. वेदांता फॉक्सकॉनच्या मुद्द्यावरून सामनातून टीका करण्यात आली आहे. “वेदांतासारखा महाराष्ट्राच्या हक्काचा प्रकल्प, त्यामुळे निर्माण होणारा लाखावर जनतेचा रोजगार एक झटक्यात हिरावला गेला, त्या दुःखाचा, वेदनेचा आहे.हे दुःखही महाराष्ट्राने व्यक्त करू नये? या वेदनेचा हुंकार मराठी जनतेने देऊ नये? त्याचा जाबही केंद्र सरकारला विचारू नये? तो विचारला तर त्यावरूनही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आगपाखड करायची हा कुठला प्रकार?”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.
“सीतारामन मॅडम, वेदांतावरून विरोधकांना विचारणा करण्यापूर्वी तुम्हीच आधी काही प्रश्नांची उत्तरे द्या. वेदांता प्रकल्प नको असे एखादे आंदोलन महाराष्ट्रात झाले का? हा प्रकल्प गुजरातमध्येच व्हावा, अशी मागणी गुजरातमधील जनतेने कुठे आणि कधी केली? फक्त केंद्र सरकारचीच मंजुरी बाकी असताना प्रकल्प महाराष्ट्रातून गायब कसा झाला? महाराष्ट्राच्या मनात उसळणारे असे असंख्य रास्त सवाल आहेत. आधी त्यांचे जवाब द्या आणि मग विरोधकांवर आगपाखड करा”, असं म्हणत सामनातून सीतारामन यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
“केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मध्यंतरी पुणे-बारामती असा दौरा करून गेल्या. जाताना नेहमीप्रमाणे त्यांनी राज्यात आधी सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारला उद्योगांच्या प्रश्नावरून लक्ष्य केले. विशेषतः वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यावरून झालेल्या कोंडीने या सर्वच मंडळींच्या नाकातोंडात बरेच पाणी गेले आहे. त्यामुळे वेदांतावरून समोरून प्रश्न आला की यांचा तिळपापड होतो”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
“बुलेट ट्रेनला 100 कि.मी. प्रतितास वेग पकडण्यास 55 सेकंद लागतात तर ‘वंदे भारत एक्प्रेस’ हाच वेग 53 सेकंदांत पकडते, असे दिसून आले आहे. तेव्हा एक लाख कोटींचे कर्ज देशाच्या डोक्यावर वाहणारी बुलेट ट्रेन हवीच कशाला?”, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.