“शेतकऱ्यांनी गावं विकायला काढलीत, राज्यपालजी, आपल्याला माहितीय का?”, सामनातून सवाल

| Updated on: Oct 23, 2022 | 9:09 AM

आजच्या सामनाच्या रोखठोक सदरातून अवकाळी पाऊस, त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान यावर भाष्य करण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांनी गावं विकायला काढलीत, राज्यपालजी, आपल्याला माहितीय का?, सामनातून सवाल
Follow us on

मुंबई : आजच्या सामनाच्या रोखठोक सदरातून अवकाळी पाऊस, त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान यावर भाष्य करण्यात आलं आहे. तसंच राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. “महाराष्ट्रातील शेतकरी पीकपाण्यासह महाप्रलयात वाहून गेला. पोलिसांच्या बदल्यांवरून मुख्यमंत्री शिंदे रुसले आहेत. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस स्वतंत्रपणे कामे करीत आहेत. एकमेकांवर रोज चिखलफेक करणारे राजकारणी क्रिकेटच्या मैदानात स्नेहभोजनासाठी एकत्र येतात, पण राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांची गावे विकायला काढली. आपल्या राज्यपालांना हे माहीत आहे काय?”, असं सामनातून (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

शिंदे सरकारची स्थिती बाळंतिणीसारखी!

शिंदे सरकारची स्थिती ओल्या बाळंतिणीसारखी आहे. थोडा वेळ देऊ त्यांना. पुढे काय? पुढचं पुढे.मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. भारतीय जनता पक्षाने शिंदे व त्यांच्या काही लोकांना ‘ईडी’ वगैरेच्या फासातून तूर्त वाचवले, पण या सगळ्यांना कायमचे गुलाम करून ठेवले. सरकारचे सर्व निर्णय उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस घेतात व मुख्यमंत्री शिंदे ते निर्णय जाहीर करतात. आता दिल्लीसही फडणवीस एकनाथ शिंदेशिवाय जातात, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी

महाराष्ट्रातील दिवाळी शेतकऱ्यांसाठी बरी नाही. सर्वत्र महाप्रलय आहे आणि शेतकऱ्यांची खरीप आणि रब्बी हंगामातील पिके वाहून गेली. शेतकरी अडचणीत आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होईल. पण आपले सर्वपक्षीय शेतकरी राजकारणी मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी एकत्र आले व त्यांनी वानखेडे मैदानावर स्नेहभोजन केले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, श्री. शरद पवार आणि शिवसेनेचे लोकही त्यात सामील झाले. हा ‘स्नेह’ इतर वेळी कुठे अदृश्य होतो?, असा सवालही सामनातून विचारण्यात आलाय.

राज्यपाल बेपत्ता!

महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या कुठे भूमिगत झाले आहेत याबाबत कोणी खुलासा करेल काय? मुळात आपले राज्यपाल राजभवनात आहेत की नाहीत, ते गृहमंत्री श्री. फडणवीस यांनी जनतेसमोर आणावे. ‘ठाकरे’ सरकारच्या काळात सध्याच्या राज्यपाल महोदयांची काम करून दमछाक होत होती. राज्यपालांची ही दिवाळी तशी थंडच दिसते. राज्यपाल व शिंदे-फडणवीस सरकारच्या माहितीसाठी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली एक बातमी देतो व विषय संपवतो, असं म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही टीका करण्यात आली आहे.