मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून नव्या स्वातंत्र्यावर भाष्य करण्यात आलं आहे. “हिंदुस्थानी स्वातंत्र्य चळवळीने जी उदारमतवादी जीवनमूल्ये प्रमाण मानली व ज्या मूल्यांसाठी स्वातंत्र्य मिळवले, त्यावरच आघात करणारी शक्ती इंदिरा गांधींच्या रूपाने प्रबळ झाल्यावर जयप्रकाश त्या शक्तीविरुद्ध उभे राहिले आणि म्हणून एकाधिकारशाहीविरोधी लढय़ास नैतिक पातळी प्राप्त झाली . आज इंदिरा गांधींची राजवट बरी असे वाटावे इतके अधःपतन सुरू आहे . जयप्रकाश नारायण (Jayaprakash Narayan) आता असते तर त्यांनी आणखी एका स्वातंत्र्याचा लढा निर्माण केला असता”, असं आजच्या सामनातून (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.
इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणी विरोधात जयप्रकाश नारायण यांनी दिलेल्या लढय़ाची आठवण तुम्ही करून देता, पण सध्याचे भाजप शासन तर आणीबाणीपेक्षा वाईट, भयंकर स्थिती निर्माण करून राज्य करीत आहे व या आणीबाणीविरुद्ध आज विरोधी पक्षांतील काँग्रेस व इतर विरोधक लढा देत आहेत, असं म्हणत इंदिरा गांधींच्या कार्यकाळाला सॉफ्ट कॉर्नर तर मोदी सरकारच्या कामावर सामनातून टीका करण्यात आली आहे.
इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाही कारभाराविरोधात जयप्रकाश नारायण यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणले व जनता पक्षाची स्थापना केली. सर्व विरोधकांनी आपले विचार, चिन्ह, अहंकार गुंडाळून ठेवले व जयप्रकाश यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इंदिरा गांधींविरोधात विजय प्राप्त केला. 1977 साली जनता पक्षाचा विजय झाल्यानंतर आपण दुसरे स्वातंत्र्य आणल्याचे जनता पक्षाने जाहीर केले आणि जयप्रकाशजींना दुसरे महात्मा गांधी बनवून राष्ट्रपित्याचे स्थान दिले, पण हुकूमशाहीविरोधात एकत्र आलेल्या विरोधकांत ऐक्य राहिले नाही व जयप्रकाशजींच्या क्रांतीचा त्यांच्या हयातीतच चक्काचूर झाला. अमित शहा यांना जयप्रकाश नारायण किती कळले? असा प्रश्न नितीश कुमारांनी विचारला, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.
आज क्रांतीची भाषा करणाऱ्या राजकीय विरोधकांना देशद्रोही ठरवून तुरुंगात ढकलले जात आहे. त्याच हुकूमशाही हातांनी जयप्रकाश नारायण यांच्या प्रतिमेचे अनावरण करावे ही लोकशाही व स्वातंत्र्याची शोकांतिकाच म्हणायला हवी. शालेय पुस्तकांत अनेक धडे सध्या घुसवले जातात. ‘जयप्रकाश नारायण यांचा हुकूमशाहीविरुद्ध लढा’ हा धडाही नव्या पिढीसाठी शालेय पुस्तकांत घाला. अमित शहा यांनी त्या कामी पुढाकार घ्यावा ही विनंती!, असं सामनातून म्हणण्यात आलं आहे.