महाराष्ट्र धुमसतोय!; दंगली कोण भडकवतंय?; सामनातून सवाल

| Updated on: May 17, 2023 | 11:15 AM

महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा उघडून भाजप सामाजिक सलोखा बिघडवून पाहतंय; सामनातून टीकास्त्र

महाराष्ट्र धुमसतोय!; दंगली कोण भडकवतंय?; सामनातून सवाल
Follow us on

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील दंगलींवर भाष्य करण्यात आलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर आणि विशेषत: भाजपवर टीका करण्यात आली आहे. ज्यांची सत्ता दंगलीच्या ज्वालेतून निर्माण झाली त्यांना दंगलीचे व धार्मिक तणावांचे प्रेम असणारच, पण देशाची जनता आता अशा तणावास विटली आहे. महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा उघडून भाजप व त्यांचे पुरस्कर्ते सामाजिक सलोखा बिघडवून मतांचे ध्रुवीकरण करू पाहत आहेत. काही विषय सामंजस्याने, सलोख्याने सोडवले जाऊ शकतात; पण शिवसेना फोडून राज्य केले जात आहे, त्याप्रमाणे समाज फोडून त्यांना निवडणुका लढवायच्या असाव्यात, असं म्हणत सामनातून सरकारवर टीका करण्यात आली आहे.

भारतीय संविधान, राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक सलोखा यांची ऐशी की तैशी करून सत्ता भोगणारे गारदी सभोवती वावरत आहेत. राज्यातील जनतेने महाराष्ट्र हितासाठी सावध राहावे!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून जातीय आणि धार्मिक दंगलींचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे वाऱ्यावर आहेत आणि गृहमंत्री फडणवीस नावालाच आहेत असेच एकंदरीत दिसते. दंगली पेटवून राजकीय भाकऱ्या शेकायच्या हा भाजपचा पिढीजात धंदा आहे व निवडणुका जवळ आल्या की या धंद्यातील गुंतवणुकीत वाढ केली जाते. असे गुंतवणूकदार आता आपल्या राज्यात घुसले आहेत. म्हणूनच आम्हाला महाराष्ट्राच्या भवितव्याची चिंता वाटते, अशी भीती सामनातून व्यक्त केली आहे.

विदर्भातील अकोला येथे शनिवारी दोन गटांत दंगलीचा भडका उडाला. किरकोळ वादातून हाणामारी व त्यातून दंगलीची आग भडकली. ही दंगल हाताळण्यात पोलीस कमी पडले. सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाली आणि त्यातून वादाला सुरुवात झाली. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला. अकोला येथे सध्या 144 कलम लागू करण्यात आले आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

कधी नव्हे ते यावेळी रामनवमीस मुंबईसह काही भागांत दंगली झाल्या. छत्रपती संभाजीनगरात हिंसाचाराचा भडका उडाला. हे कसले लक्षण मानायचे? राज्यात सध्या भडकविल्या जात असलेल्या दंगली राजकीय हेतूने प्रेरित आहेत. त्या जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत. काही लोक आगीत तेल वगैरे ओतण्याचे काम करीत आहेत. त्यांचे चेहरे मी लवकरच बाहेर आणेन, असा इशारा गृहमंत्री श्री. फडणवीस यांनी दिला. पण त्यांचे बोलणे सध्या फोल ठरत आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.