मुंबई : “राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी मुंबईसंदर्भात एक वक्तव्य केले. ‘गुजराती राजस्थानी नसतील तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’ असे ते म्हणाले. राज्यात संतापाचा भडका उडाल्यावर राज्यपालांनी माफी मागितली, पण प्रश्न कायम आहे! मुंबई व गुजराती बांधवांचे नाते काय? गुजराती मुंबईत कधी आले?”, असा सवाल सामनाच्या आजच्या रोकठोकमधून विचारण्यात आलाय. काही दिवसांआधी राज्यपाल भगत सिंग कोश्यारींनी यांनी गुजराती लोक मुंबईत नसतील तर आर्थिक राजधानी ही ओळख पुसली जाईल, असं विधान केलं होतं. त्याचा आज सामनातून समाचार घेण्यात आलाय. “राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची अखेर माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राबाबत चुकीची विधाने केल्याबद्दल पंडित नेहरू व मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती. नेहरू व मोरारजी देसाई यांनी इतिहासातील चुकीच्या संदर्भाचा आधार घेत विधाने केली. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाचा आगडोंब उसळला. नेहरूंसारख्या लोकप्रिय नेत्यालाही महाराष्ट्राची माफी मागावी लागली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केलाच तर मराठी माणूस उसळून बाहेर पडतो, हा इतिहास आहे”, असंही रोखठोकमध्ये म्हणण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात व खासकरून मुंबईत गुजराती समाज पूर्वापार आहे, पण मुंबईवर हक्क आणि पगडा मराठी माणसाचाच राहील. मुंबईत मराठी माणसाचा ‘टक्का’ कमी झाला. मुंबईची आर्थिक सूत्रे मराठी माणसाकडे नसतीलही, पण ही मुंबई मराठी माणसानेच घडवली असे इतिहास सांगतो. मुंबईवर मराठय़ांचे राज्य कधीच नव्हते, असे सांगण्याचा वारंवार प्रयत्न झाला. मुंबईवर मराठय़ांनी कधीच राज्य केले नाही, गुजरातने मात्र केलेले आहे असा संदर्भ आजही काही लोक देत असतात. तो खरा नाही. सत्य व इतिहास असा आहे की, मुंबईवर इतिहासकाळात राज्य करणारे गुजराती म्हणजे मुसलमान सुलतान होते, पण त्यांचेही कर्तृत्व असे की, फिरंग्यांच्या सततच्या हल्ल्यांना कंटाळून त्यांनी मुंबई फिरंग्यांना देऊन टाकली! सन 1534 सालात बहादूरशहा बेगदाने हा करार केला! दुसऱयाचा माल तिसऱयाला देऊन स्वतःचा जीव वाचविण्याची दलाली या बेगदाने घेतली. मराठी राज्यकर्त्यांनी फिरंग्यांबरोबरच्या लढाईत प्राण दिले. तेव्हाच मुंबई शत्रूना घेता आली. मुंबईसाठी मराठी व मराठे आपले रक्त सांडतात हा इतिहास आहे व श्री. कोश्यारी यांच्यासारख्या महनीय व्यक्तींनी तो समजून घेतला पाहिजे. मुंबईत मराठी माणूस सतत श्रम करीत राहिला व संकटांशी लढत राहिला. बाकी सगळे आले ते फक्त लक्ष्मीदर्शनासाठी.
मुंबईत गुजराती लोक 1669 सालापासून राहण्यास आले. ते कोणत्या परिस्थितीत येथे आले, याचा लेखी पुरावाच उपलब्ध आहे. ‘इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी’ या पुस्तकात 26 नोव्हेंबर 1669 चे एक पत्र प्रसिद्ध झाले आहे.
ते पत्र म्हणजे- ‘यावेळी (म्हणजे 1669 साली) सुरतेच्या गुजराती बनियांचा धार्मिक कारणांसाठी मुसलमान राज्यकर्त्यांकडून भयंकर छळ होत होता. आपली मंदिरे भ्रष्ट होऊ नयेत आणि आपले कुटुंबीय लोक बाटविले जाऊ नयेत म्हणून हे लोक मुसलमानांना मोठमोठय़ा रकमा देत असत, पण तरीही त्यांचा छळ कमी होईना. म्हणून त्यांनी देशत्याग करण्याचे ठरविले. सुरतेचा जुना श्रेष्ठा तुळशीदास पारख याच्या पुतळय़ालाही मुसलमानांनी बाटविले. या बाटवाबाटव तुळशीदासच्या अंतःकरणाचा ठाव सुटला. आपल्या घराण्याची अब्रू गेली असे त्याला वाटले. आपल्या जातीवर हे संकट आले असे समजून बनियांनी सुरत सोडण्याचा निश्चय केला, पण गुजरातमधून पळून जाण्यापूर्वी या बनियांचे पाच प्रतिनिधी भीमजी पारख यांच्या नेतृत्वाखाली जिराल्ड अँजिअरला येऊन भेटले. आपल्यावरील संकटाची कल्पना दिली. सुरतेहून आपण पळून आलो तर मुंबई बेटांत आपल्याला रक्षण मिळावे अशी विनंती केली. अँजिअरकडून त्यांनी संरक्षण मागितले. हे लोक आले तर मुंबईचे वैभव वाढविण्यास मदत होईल हे त्याने ओळखले, पण सध्याच्या परिस्थितीत त्यांना संरक्षण देणे धोक्याचे आहे असेही त्याला वाटले.