मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून काश्मीरी पंडितांवर (Kashmiri Pandit) भाष्य करण्यात आलंय. “गेल्या वर्षभरात 24 कश्मिरी पंडित आणि बिगर कश्मिरी नागरिकांची अतिरेक्यांनी हत्या केली आहे. त्यात आता ‘ टीआरएफ ‘ या पाकपुरस्कृत अतिरेकी संघटनेने कश्मिरी पंडित असलेल्या 57 कर्मचाऱ्यांची हिटलिस्ट जाहीर करावी , हे धक्कादायक आहे . 370 कलम रद्द केल्यानंतर कश्मीरात सारे काही आलबेल होईल , असा शब्द मोदी सरकारने दिला होता , त्याचे काय झाले ? गुजरातच्या निवडणुका संपल्या आहेत . आता तरी केंद्रातील सत्तापक्ष ‘ इलेक्शन फिव्हर ‘ मधून बाहेर पडून कश्मिरी पंडित आणि देशावर आलेल्या या संकटाचा मुकाबला करण्यासाठी वेळ काढेल काय?”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.
देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी प्राणपणाने व्यूहरचना आखण्यात मश्गूल असतानाच जम्मू-कश्मीरात मात्र पाकपुरस्कृत अतिरेकी संघटनेने कश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे कट-कारस्थान रचल्याची भयंकर बातमी आहे. इकडे केंद्रातील सत्तापक्ष गुजरातच्या प्रचारसभांत, निवडणुकीच्या जोड-तोडीपासून रोड शोपर्यंतचे सूक्ष्म नियोजन करण्यात गुंतला असतानाच तिकडे कश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या 57 कश्मिरी पंडित सरकारी कर्मचाऱ्यांची गोपनीय यादीच दहशतवाद्यांनी आपल्या वेबसाईटवर जाहीर केली आहे, असं म्हणत काश्मीरी पंडितांवर भाष्य करण्यात आलं आहे.
गेल्या वर्षभरात दहशतवाद्यांकडून कश्मिरी पंडितांची वेचून हत्या केली जात आहे. शिक्षक, बँक अधिकारी, कर्मचारी यांच्या सातत्याने सुरू असलेल्या ‘टार्गेट किलिंग’मुळे कश्मिरी पंडितांमध्ये आधीच भय व दहशतीचे वातावरण आहे. त्यात लष्कर-ए-तोयबासोबत काम करणाऱ्या ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या अतिरेकी संघटनेने कश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या पंडित कर्मचाऱ्यांची यादीच जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.