शत्रूवरही येऊ नये म्हणतात ती वेळ पाकिस्तानवर; संजय राऊतांनी पाकिस्तानमधील परिस्थिती सांगितली…

| Updated on: Jan 05, 2023 | 7:44 AM

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पाकिस्तानवर ओढावलेल्या आर्थिक संकटावर भाष्य करण्यात आली आहे.

शत्रूवरही येऊ नये म्हणतात ती वेळ पाकिस्तानवर; संजय राऊतांनी पाकिस्तानमधील परिस्थिती सांगितली...
Follow us on

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पाकिस्तानवर ओढावलेल्या आर्थिक संकटावर (Pakistan Economic Crisis) भाष्य करण्यात आली आहे. पाकिस्तान भयावह आर्थिक संकटातून जात आहे. हे आरिष्ट थोपवण्याची क्षमताही पाकिस्तान गमावून बसला आहे. त्यामुळे महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईमुळे जर्जर झालेली पाकिस्तानी जनता उद्या श्रीलंकेप्रमाणेच सत्ताधाऱ्यांच्या घरादारांत घुसली तर आश्चर्य वाटायला नको, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

गरिबी आणि मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून दहशतवाद व शस्त्रखरेदीवर पैसा उधळल्यामुळेच पाकिस्तानवर ही वेळ ओढवली. शत्रूवरही येऊ नये म्हणतात ती वेळ हीच!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

गंभीर आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत माजलेल्या यादवीचे भयंकर चित्र काही महिन्यांपूर्वी साऱ्या जगाने पाहिले. हिंदुस्थानचा दुसरा शेजारी असलेला पाकिस्तानही महागाई, टंचाई आणि कंगाली अशा तिहेरी आर्थिक संकटास सामोरा जात आहे. दिवसेंदिवस खोल गर्तेत जाणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तानची वाटचालही श्रीलंकेतील यादवीच्या दिशेनेच सुरू असल्याची भीती आता व्यक्त केली जात आहे.

गेली काही वर्षे पाकिस्तान सातत्यानेच आर्थिक संकटाचा सामना करतो आहे आणि आता तर या संकटाने पाकिस्तानला खोल खाईतच ढकलले आहे. एखादी कर्जबाजारी व्यक्ती घर चालवण्यासाठी जशी घरातील किडुकमिडुक वस्तू विकायला लागते, तशीच अवस्था आज पाकिस्तानवर ओढवली आहे, असं म्हणत सामनातून पाकिस्तानमधील आर्थिक संकटावर भाष्य करण्यात आलं आहे.

आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी सातत्याने परकीय चलन वापरल्यामुळे गेल्या वर्षभरात पाकिस्तानच्या तिजोरीतील परकीय चलनात तब्बल 58 कोटी 40 लाख डॉलर्सची घट झाली. आता जेमतेम सहा अब्ज डॉलर एवढेच परकीय चलन पाकिस्तानच्या तिजोरीत उरले आहे.

2014 पासून म्हणजे गेल्या आठ वर्षांतील हा सर्वात नीचांकी परकीय चलनसाठा आहे. निर्यातीपेक्षा आयात करण्यावर पाकिस्तानचा अधिक भर आहे आणि बाहेरच्या देशांतून होणाऱ्या आयातीसाठी तर परकीय चलनच मोजावे लागते. परिस्थिती इतकी भयावह आहे की, कशीबशी महिनाभर आयात करता येईल एवढीच परकीय पुंजी पाकिस्तानकडे उरली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.