राजकीय सूडनाट्यातून इम्रान खान यांना अटक, पुढे काय होणार?; सामनातून पाकिस्तानमधील घडामोडींवर भाष्य

| Updated on: May 10, 2023 | 10:22 AM

Pakistan Ex PM Imran Khan Arrest News : क्रिकेटच्या खेळातून राजकारणाच्या खेळखंडोब्यात पडलेल्या इम्रान यांचे पुढे काय होणार?; इम्रान खान यांच्या अटकेवर सामनातून भाष्य

राजकीय सूडनाट्यातून इम्रान खान यांना अटक, पुढे काय होणार?; सामनातून पाकिस्तानमधील घडामोडींवर भाष्य
Follow us on

मुंबई : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाली आहे. त्यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. आपल्या राजकीय विरोधकांना वाट्टेल त्या पद्धतीने संपवणे, खोटेनाटे आरोप करून तुरुंगात डांबणे, बदनामीच्या मोहिमा उघडणे, असे भयंकर प्रकार हल्ली देशोदेशीच्या राजकारणात प्रचलित झाले आहे.अशाच राजकीय सूडनाट्यातून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आता अटक झाली, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

पंतप्रधानपद भोगलेल्या नेत्यांना पाकिस्तानात एक तर तुरुंगात पाठवले जाते, फासावर लटकवले जाते किंवा देशाबाहेर जाऊन परागंदा जीवन जगावे लागते. पाकिस्तानच्या या काळय़ाकुट्ट इतिहासात आता आणखी एक नाव समाविष्ट झाले. क्रिकेटच्या खेळातून राजकारणाच्या खेळखंडोब्यात पडलेल्या इम्रान यांचे पुढे काय होणार, या प्रश्नाचे उत्तर आज तरी कोणीच देऊ शकत नाही!, असं म्हणत सामनातून पाकिस्तानमधील घडामोडींवर भाष्य करण्यात आलं आहे.

पाकिस्तानचे लष्कर आणि तेथील शरीफ सरकारने मिळून हे कारस्थान रचले आणि इम्रान खान यांना अटक झाली. पंतप्रधान पदावर असताना इम्रान यांनी अल-कदीर ट्रस्टच्या एका विद्यापीठाला कोटय़वधी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे दिली, असा आरोप आहे. पाकिस्तानचे एक अब्जाधीश उद्योगपती मलिक रियाज यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून ही अटकेची कारवाई झाली, असे वरकरणी भासवले जात असले तरी अटकेमागे हेच नेमके कारण आहे, यावर खुद्द पाकिस्तानची जनताही विश्वास ठेवणार नाही, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

लष्कराच्या या दडपशाही विरुद्ध प्रथमच पाकिस्तानातील जनता रस्त्यावर उतरल्याचे चित्र अनेक शहरांत दिसते आहे. संतप्त जनता रस्त्यावर दिसेल त्या सैनिकांवर हल्ले चढवत आहे. रावळपिंडीत तर पाक सैन्याच्या एका कोअर कमांडरचा बंगलाच जमावाने पेटवून दिला. बंदुकांची पर्वा न करता लोक लष्कराच्या छावण्यांमध्ये घुसून तोडफोड जाळपोळ करीत आहेत. लष्कराची प्रचंड दहशत असलेल्या पाकिस्तानात आजवर असे दृश्य कधीच दिसले नव्हते. हे लोण देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले तर लोकशाहीचे रक्षण व सैन्य आणि सरकारच्या मुस्कटदाबी विरुद्ध पाकिस्तानात गृहयुद्धाचा भडकाही उडू शकतो, अशी भीतीही सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.