मुंबई : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार सध्या युती सरकारमध्ये सामील झालेत. अजित पवार यांच्याकडे राज्याचं उपमुख्यमंत्रिपद आहे. शिवाय त्यांच्या समर्थक आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. पण आधी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी पक्षावर टीका केली होती अन् लगेच अजित पवार यांचं युतीचा भाग होणं, यावर टीका केली जात आहे. सामनाच्या रोखठोक या सदरातही यावर भाष्य करण्यात आलं आहे. भाजपवर जोरदार टीका केली आहे. देश बुडवणाऱ्यांच्या हातात महाराष्ट्र, या शीर्षकाखाली आजचं रोखठोक सदर प्रसिद्ध झालं आहे.
“देशातील भाजप विरोधक हे देशबुडवे आहेत, असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी भोपाळमधून केला व पुढच्या 72 तासांत महाराष्ट्रातील देशबुडव्यांनी भाजपशी हातमिळवणी करून मंत्रीपदाची शपथ घेतली. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची भाजपची तयारी दिसते. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोधकांचे पक्ष फोडण्याची त्यांना चटक लागली आहे!
देश बुडविण्याचा विरोधकांचा डाव हाणून पाडा!” असा आदेश भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे दिला आणि पुढच्या 72 तासांत आपला देश बुडविणारयांपैकी महाराष्ट्रातील अजित पवारांसह जवळपास 40 आमदारांना भाजपात घेऊन ‘पवित्र’ करण्यात आले. याआधी असे अनेक ‘देशबुडवे’ भाजपने पवित्र करून घेतले.
आसामचे सध्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा हे अशाच देशबुडव्यांपैकी एक. आज हे महाशय पंतप्रधान मोदी व भाजपचे गोडवे गात आहेत. पंतप्रधान आपल्या राजकीय विरोधकांना ‘देशबुडवे’ ठरवतात व त्याच देशबुडव्यांना भाजपात घेऊन सत्ता स्थापन करतात. अजित पवार यांच्यासह जवळपास 40 आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली व ते सरळ भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत सहभागी झाले.
अजित पवार यांच्यावर 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप स्वतः देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी यांनी केला. भाजपचे एक शिलेदार किरीट सोमय्या यांनी कागलच्या हसन मुश्रीफांवर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. ‘ईडी’ने त्यांच्या अटकेची सर्व तयारी केली.
मुश्रीफ हे तात्पुरत्या जामिनावर बाहेर होते. तेही आता अजित पवारांबरोबर भाजपच्या गोटात गेले व मंत्री झाले. छगन भुजबळ यांच्याविरुद्ध मोहीम राबवणारे स्वतः फडणवीस व सोमय्या हेच होते. वळसे-पाटील, धनंजय मुंडेही गेले. भाजपात सामील झाल्यामुळे या सगळ्यांना आता शांत झोप लागेल. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राजकीय हत्यारासारखा सुरू आहे. पाकिटमारांना आत टाकायचे व दरोडेखोरांना भाजपात प्रवेश देऊन शुद्ध करायचे असे एकंदरीत धोरण आहे. कालचे देशबुडवे एका रात्रीत देशभक्त कसे होतात ते महाराष्ट्रात दिसले!
अजित पवार यानी त्यांच्या पहिल्या भाषणात आपला कसा छळ झाला ते सांगितले. यावर सामाजिक कार्यकर्ते विशंभर चौधरी यांनी समाजमाध्यमांवर मार्मिक टिप्पणी केली आहे, “खरंच खूप सहन केल. सात वेळा आमदारकी, एक वेळ खासदारकी, पंधरा वर्षं मंत्री, चार वेळा उपमुख्यमंत्री, एकदा विरोधी पक्षनेते! खूपच सहन केले. दुसरा कोणी पुतण्या असता तर कधीच सोडून गेला असता!”