मुंबई : 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून सामनातून टोला लगावण्यात आला आहे. मोदी सरकार देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. तशी चाचपणीदेखील सुरू आहे. त्यावर आजच्या सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. आमदार अपात्र ठरावेत असंच तुम्हालाही वाटतं ना? असा सवालही सामनातून विधानसभा अध्यक्षांना विचारण्यात आला आहे.
न्यायाच्या बाबतीत समानता ठेवणे हासुद्धा समान नागरी कायदा आहे. विरोधी पक्षांतील लोकांना भ्रष्टाचारविरोधी कायद्याने अडकवायचे, पण स्वपक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना, मंत्र्यांना अभय द्यायचे, हा कोणता कायदा?
‘स्वतःचा तो बाब्या व दुसऱ्याचे ते कार्टे’ अशा प्रकारचा ‘दुहेरी’ कायदा सध्या देशात राबवला जात आहे व पंतप्रधान मोदी भोपाळात समान नागरी कायद्याचा गोपाळा करीत आहेत, पण त्यांचा समान नागरी कायदा म्हणजे एक प्रकारे हम करे सो समान कायदा असाच आहे. हे ढोंग आहे. आधी भिवंडीत नगरसेवकांना अपात्र ठरविणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःसह 40 बेइमान आमदारांना स्वतःच अपात्र घोषित करून मोदी यांनी पुकारलेल्या समान नागरी कायद्याचा मान राखावा. अध्यक्ष महोदय, तुम्हाला हेच अपेक्षित आहे ना?
पंतप्रधान मोदी एक बोलतात, पण त्यांचे अंधभक्त किंवा टाळकुटे नेमके वेगळे करतात. हे आता नित्याचेच झाले आहे. मोदी यांनी काल भोपाळ येथे देशाला प्रश्न केला, ”एका घरात कधी दोन कायदे असतात का? अशी दुहेरी व्यवस्था देशात बरी नाही!” मोदी यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत.
निवडणुका जवळ आल्याने मोदी यांनी अपेक्षेप्रमाणे समान नागरी कायद्याला हात घातला. एकाच देशात दोन कायदे असूच नयेत, पण ‘एक देश दोन कायदे’ हे मोदींच्याच राज्यात निर्माण झाले. म्हणजे एक देशाचा कायदा आणि दुसरा हम करे सो कायदा! महाराष्ट्रात 40 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्या बासनात गुंडाळून ठेवले आहे. शिवसेनेचा आदेश झुगारून मतदान करणाऱया मिंधे गटाच्या 40 आमदारांना घटनेच्या 10 व्या शेड्युलप्रमाणे अपात्र ठरवावेच लागेल असे कायदा सांगतो, पण या बेइमानांना वाचविण्यासाठी ‘मोदी सरकार’ शर्थ करीत आहे.
विरोधी पक्षांतील लोकांना भ्रष्टाचारविरोधी कायद्याने अडकवायचे, पण स्वपक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना, व्यापाऱ्यांना, मंत्र्यांना अभय द्यायचे, हा कोणता कायदा? अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर वारेमाप खर्च केला म्हणून चौकशी सुरू केली, पण महाराष्ट्रातील सरंजामदारांनी स्वतःकडे दोन दोन-चार चार सरकारी बंगले ठेवून त्यावर वारेमाप उधळपट्टी केली. येथेही त्याच कायद्याचा बडगा दाखवायला हवा. ‘स्वतःचा तो बाब्या व दुसऱ्याचे ते कार्टे’ अशा प्रकारचा ‘दुहेरी’ कायदा सध्या देशात राबवला जात आहे व पंतप्रधान मोदी भोपाळात समान नागरी कायद्याचा गोपाळा करीत आहेत, पण त्यांचा समान नागरी कायदा म्हणजे एक प्रकारे हम करे सो समान कायदा असाच आहे. हे ढोंग आहे.