मुंबई : महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून ‘कलंक’ हा शब्द चर्चेत आहे. ‘कलंक’ शब्दाचा वापर करत टीका टीपण्णी केली जात आहे. सामनाच्या आजच्या रोखठोक सदरातून भाष्य करण्यात आलं आहे. यात महाराष्ट्रात कलंकित राजकारण सुरु असल्याचं म्हणण्यात आलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप पक्षावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
देवेंद्र फडणवीस व त्यांचे समर्थक ‘कलंक’ शब्दावरून चिडले आहेत. महाराष्ट्रात सध्या जे कलंकित राजकारण सुरू आहे. त्याचे सूत्रधार मोदी-शहांइतकेच श्री. फडणवीस आहेत. महाराष्ट्राच्या परंपरेचा, संस्कृतीचा स्तर इतका खाली घसरलाय की मन दुःखी होते. महाराष्ट्र शिवरायांच्या मार्गाने निघाला होता, तो आता मोदी-शहांच्या मार्गाने जाताना दिसतोय. याला जबाबदार कोण?
‘कलंक’ शब्दावरून सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. सर्व प्रकारचे कलक धुऊन देण्याची योजना सध्या भारतीय जनता पक्ष राबवीत आहे. आमच्यात सामील व्हा व ‘डाग’ धुऊन घ्या अशी ती योजना. तरीही ‘कलंक’ शब्दाचा किती मोठा धसका भाजपने घेतला ते महाराष्ट्राने पाहिले. विदर्भाच्या दौऱ्यात असताना उद्धव ठाकरे नागपुरात पोहोचले व मेळाव्यात बोलताना श्री. देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक असल्याचे बोलून गेले. यावर भारतीय जनता पक्षातील फडणवीस समर्थक खवळले.
देवेंद्र फडणवीस यांनी ‘कलक’ उपाधी फार व्यक्तिशः घेतली. सध्याचे महाराष्ट्राचे राजकारण हे राज्याच्या प्रतिष्ठेला कलंक लावणारे आहे व त्याचे सूत्रसंचालन स्वतः फडणवीस करीत आहेत या अर्थानि श्री. ठाकरे बोलले. ‘कलंक’ ही भाषा बरी नाही.
महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही असे यावर बोलले गेले, पण श्री. फडणवीस यांनी ज्यांना राजकारणात पोसले व वाढवले असे पडळकर, बावनकुळे, सदाभाऊ खोतांसारखे लोक शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत कोणत्या भाषेचा वापर करीत आहेत?
कलंक प्रकरणापूर्वी दोन दिवस आधी सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ‘सैतान’ असे संबोधले, पण खोत यांची भाषा परंपरा व संस्कृतीला धरून नाही असा सूर फडणवीस किंवा त्यांच्या समर्थकांनी लावला नाही. महाराष्ट्राची संस्कृती, भाषा, परंपरा पूर्णपणे कलंकित करण्याची कामगिरी भारतीय जनता पक्षाने गेल्या अडीच वर्षांपासून सुरू केली व त्याचे भीष्म पितामह नागपुरात बसले आहेत.
सिंहासन’ पुढचे मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळेच राजकीय विरोधकांना व्यक्तिगत शत्रू मानून चिखलफेक करीत आहेत. त्यामुळे ‘फडतूस’, ‘कलंक’ अशा शब्दांचा वापर महाराष्ट्रात जोरकसपणे सुरू आहे. शिंदे गट व नव्याने आलेला अजित पवार गट यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे व खासगीत एकमेकांविषयी कोणत्या शब्दांचा वापर होतोय ते वेशभूषा बदलून कोणीतरी जाऊन ऐकायला हवे. पुन्हा दुसऱ्या बाजूला श्री. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचे संबंधही बरे नाहीत. त्याच्यातला संवाद वरवरचा आहे. त्यात आता अजित पवार व त्यांचे चाळीस लोक आले. त्यामुळे शिंदे गटाची हवाच निघाली.
श्री. फडणवीस यांच्याशी वैयक्तिक वैर असण्याचे कारण नाही. ते गृहस्थ चांगले. पण राजकारणात कर्तृत्वापेक्षा भाग्याने त्यांना सर्व मिळाले, पण महाराष्ट्रासाठी त्यांनी काय केले? हा प्रश्न आहेच. महाराष्ट्रातील अनेक उद्योग त्यांच्या डोळ्यासमोर गुजरातेत खेचून नेले. महाराष्ट्राच्या शिखरावरील सोन्याचे कळस तुमच्या डोळ्यांसमोर कापून नेले. कोरोना काळात महाराष्ट्राला गरज असताना भाजप आमदार-खासदारांच्या मानधनाचा निधी फडणवीस यांनी बिगर सरकारी खासगी स्वरूपाच्या ‘पीएम केअर फंडाकडे वळवला. महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्रात राहू नये असे ज्यांना वाटते, त्यांना महाराष्ट्राचे स्वाभिमानी कसे मानायचे?
औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात राजकीय शेरेबाजी चालते. राज्यप्राप्तीसाठी औरंगजेब आपल्या जन्मदात्या पित्यास कैदेत ठेवू शकला आणि सख्ख्या भावाचा खूनही केला. महाराष्ट्राने शिवरायांचा मार्ग सोडला. तो वेगळ्याच मार्गाने निघाला. हा मार्ग दिल्लीतील ‘शाहय़ांचा’ व औरंगजेबाचा असू नये इतकेच!