मुंबई : सामनाच्या अग्रलेखातून बिल्किस बानोवर (Bilkis Bano) झालेला अत्याचार. तिने दिलेला लढा, आरोपींना झालेली शिक्षा अन् आता झालेली माफी या सगळ्यावर भाष्य करण्यात आलं आहे. यावरून भाजपच्या हिंदुत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. “बिल्किस बानोचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. गोध्रा कांडात तिच्यावर बलात्कार झाला. तिच्या आईची, तीन वर्षांच्या मुलीची हत्या केली गेली. बिल्किसने न्यायासाठी संघर्ष केला. 11 दोषींना जन्मठेप झाली. पण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात त्या 11 दोषींना माफी मिळाली व त्यांच्यावर फुलेही उधळली गेली. हे हिंदुत्व (Hindutv) नाही. न्यायाची घंटा चोरीला गेल्याचा हा परिणाम! न्यायाची घंटाच चोरीला गेल्यावर बिल्किस असो की बिमला, तुमच्या पिंकाळ्यांना विचारतंय कोण?”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
काही गोष्टी धर्मापलीकडे जाऊन पाहायला हव्यात. मग तुम्ही धर्मनिरपेक्ष असा नाहीतर कट्टर हिंदुत्ववादी पिंवा धर्माध मुसलमान. पण आपले राज्यकर्तेच हे सर्व विसरू लागल्यावर जनतेकडून काय अपेक्षा करावी ? गुजरातच्या बिल्किस बानो प्रकरणात तेच घडले आहे. राज्यकर्ते चूप आहेत हे समजू शकतो. पण समाजही थंड लोळागोळा होऊन पडला आहे. 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलीत बिल्किस बानोवर सामुदायिक बलात्कार करण्यात आला. तिचे घर जाळले. बिल्किसची आई व तिच्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली. हे प्रकरण आधी दडपण्याचा प्रयत्न झाला. पण बिल्किस तिच्यावरील अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढाई लढत राहिली. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी गुजरातबाहेर म्हणजे महाराष्ट्रात करण्याचे ठरवले. महाराष्ट्रात खटला चालला व बिल्किसच्या गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खरे म्हणजे बलात्कार व हत्या अशा या खटल्यातील गुन्हेगारांना फासावरच लटकवायला हवे होते. पण जन्मठेपेवर निभावले. मात्र आता आझादीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने गुजरात सरकारने तुरुंगातील पैद्यांना सार्वजनिक माफीची घोषणा केली व बिल्किसच्या 11 गुन्हेगारांना ‘माफी’ देण्याचा निर्णय घेतला. हे सर्व गुन्हेगार बाहेर येताच त्यांचे सत्कार घडवून आणले गेले, त्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. हे सर्व आपल्या हिंदू संस्कृतीत बसते काय? भाजपास जो हिंदुत्वाचा पुळका आहे त्या हिंदुत्वात नारी शक्ती व महिलांचा सन्मान यास महत्त्व आहे. पण इथले हिंदुत्व बलात्काऱयांना अभय देणारे व त्यांचा सत्कार करणारे आहे. आश्चर्य असे, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात नारी शक्तीच्या गौरवाचा उल्लेख केला. त्यांच्या गुजरात राज्यातच एक बिल्किस बानो त्याच वेळी आक्रोश करीत होती! पण पंतप्रधान जे बोलतात तसे वागत नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले. बिल्किस प्रकरणात ते सत्य ठरले.
बलात्कार व खुनास राजमान्यता व समाजमान्यता देण्याचा प्रकार घातक आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा श्री. अधिरंजन चौधरी यांनी करताच स्मृती इराणींपासून समस्त भाजपास तो नारी शक्तीचा अपमान वाटला व न्यायासाठी ते सर्व तोंडाची घंटा वाजवीत राहिले. श्रीमती इराणी यांचा संताप पाहण्यासारखा होता. मग बिल्किस प्रकरणात या सर्व घंटा थंड का ? बिल्किस एक स्त्र आहे. तिने तिची इज्जत व स्वतःची मुलगी गमावली… त्या अन्यायाविरोधात ती एकाकी झुंजली. मोदी हे गुजरातला जातात तेव्हा त्यांनी या अत्याचारग्रस्त भगिनीच्या घरी जाऊन तिला आधार द्यायला हवा होता. प्रश्न इथे हिंदू-मुसलमानाचा नाही. तर हिंदुत्वाचा आत्मा आणि आपल्या महान संस्कृतीच्या प्रतिष्ठऽचा आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत हिंदूंची मते मिळावीत म्हणून बिल्किसचे गुन्हेगार सोडले असतील तर ती प्रवृत्ती देशविघातक आहे. मग देशाला अतिरेक्यांपासून धोका आहे असे बोलण्यात अर्थ नाही. धोका तर देशातच आहे. धर्माचे रूपांतर धर्माधता व अराजकतेत होत आहे.
अशा बिल्किस बानो सर्वच समाजात असू शकतात. त्या कश्मीर खोऱयात आहेत. महाराष्ट्रात आहेत. प्रत्येक राज्यांत आहेत. त्या हिंदू आहेत, मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत. न्यायासाठी त्यांचा आक्रोश सुरूच आहे. पण कधी कधी न्यायाच्या घंटेपर्यंत हात पोहोचण्याआधीच तिच्या देहाचे कलेवर होते. उत्तर प्रदेशात अशा अनेक घटना घडल्या. ‘जहांपनाह’ पर्यंत त्यांच्या पिंकाळ्या पोहोचल्याच नाहीत. कारण न्यायाची घंटाच चोरीला गेली! अस्वस्थ मनाने बिल्किस बानो काय म्हणते ते पहा, ‘मी आता काय बोलू? न्याय व्यवस्थेवरील माझी श्रद्धा दोषींच्या मुक्ततेमुळे डळमळीत झाली आहे. मी सुन्न झाले आहे. या स्थितीत कोणाही महिलेला न्याय कसा मिळेल? आपल्या देशातील सर्वोच्च न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास होता.’ बिल्किस पुढे सांगते ते महत्त्वाचे. 15 ऑगस्ट रोजी या अकरा दोषींना मुक्त केल्याचा निर्णय समजताच 20 वर्षांपूर्वी माझ्यावर झालेला आघात पुन्हा झाल्यासारखे वाटले. माझे आणि माझ्या कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त करणाऱया, माझ्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱया 11 दोषी व्यक्ती सध्या मोकळेपणाने वावरत आहेत.’ सर्वोच्च न्यायालयाने आता याप्रकरणी गुजरात सरकारला नोटीस बजावली आहे. त्यावर दोन आठवडय़ात सुनावणी होईल, पण आज ते 11 जण मोकळे आहेत व समाज चूप आहे. हेच आपले स्वातंत्र्य म्हणायचे काय? त्याच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. त्याच स्वतंत्र भारतात सर्वोच्च न्यायालये आहेत. पण न्यायाची घंटा चोरीला गेलीय!