मुंबई : ‘सत्यमेव जयते’ आणि ‘प्राण जाय पर वचन न जाय’ हे सगळ्यात मोठे संतवचन. हे संतवचन भाजपने पाळले असते तर विरोधी पक्षात बसून ‘मळमळ’ ओकण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला होता. पुढील वर्षभर तरी ‘ठाकरे सरकार’वर अविश्वास दाखवण्याच्या भानगडीत फडणवीस यांनी पडू नये, असा सल्ला अग्रलेखातून (Saamana on Opposition Party) देण्यात आला आहे.
‘संतवचनं तुकाराम महाराजांची, पण कृती मात्र मंबाजीसारखी’ असं म्हणत शिवसेनेने भाजपला टोला लगावला आहे. 105 आमदार निवडून येऊनही भाजप सत्तेवर येऊ शकला नाही. ही एक पोटातली मळमळ विरोधी पक्षनेते आणि त्यांचे सहकारी विधानसभेत व्यक्त करत आहेत. मळमळीकडे दुर्लक्ष केलेलं बरं, असं म्हणत शिवसेनेनं भाजपला कानपिचक्या लगावल्या आहेत.
लोकशाही परंपरेत विरोधी पक्षाला झुकते माप मिळायला हवे, पण झुकते माप म्हणजे फक्त मळमळ ओकणे आणि तंगड्या झाडणे नव्हे. विरोधी पक्षनेते फडणवीस हे सभागृहात नको तितक्या तावातावाने बोलतात, पण त्यांचे बोलणे बेताल आहे यावर महाराष्ट्राच्या जनतेचे एकमत झाले आहे. राज्यातले सरकार बहुमताचे आहे आणि विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षभर तरी ‘ठाकरे सरकार’वर अविश्वास दाखवण्याच्या भानगडीत फडणवीस यांनी पडू नये, असा सल्ला अग्रलेखातून देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्कवरील भाषण विधानसभेत केले : देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधी पक्षापुढे आरसा ठेवला आहे. सरकार शब्दाला पक्के नाही आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे, असं फडणवीस बोलतात. मोदी यांच्या सरकारने प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करुच हे वचन पाळलं असतं, तर शेतकरी खुश झाला असता आणि परस्पर कर्जमुक्तीही झाली असती. फसवणुकीचे प्रयोग भाजप सरकारने सुरु केले आहेत. आधी स्वतः दिलेली वचने पाळा. मग संतवचनांची उधळण करा, असंही ‘सामना’तून सुनावण्यात आलं आहे.
‘एकीकडे संत तुकारामांचा गजर करायचा आणि त्याच वेळी वर्तणूक ‘मंबाजी’सारखी करायची. विरोधी पक्षाने एकदा काय ते ठरवायला हवे. संतवचने तुकाराम महाराजांची आणि कृती मंबाजीसारखी. कालचे सत्ताधारी विरोधी बाकावर गेले व दुसरे कोणी ध्यानीमनी नसताना सत्ताधारी बाकांवर आले म्हणून त्यांच्यात दुश्मनांचे नाते असता कामा नये, पण हे असे कसे घडले? या चिडीतून काम करणे बरे नाही. उद्धव ठाकरे यांचे चित्त शुद्ध आहे. त्यामुळे नवे मित्र मिळत राहतील. विरोधी पक्षाने सावधान राहावे हेच बरे! त्यांच्यातलेही बरेच जण सरकारचे मित्र बनू शकतात, असं अग्रलेखात (Saamana on Opposition Party) म्हटलं आहे.