मुंबई : महाविकासआघाडी सरकार स्थापन होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र, तरिही खातेवाटप न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे (Saamana publish Portfolio distribution). शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिलेले असून यात खातेवाटपाची यादीही देण्यात आली आहे. विशेष म्हणजे खातेवाटप विलंबाला राज्यपालांचा ‘विश्रांतीयोग’ जबाबदार असल्याचाही आरोप सामनातून करण्यात आला आहे.
सामनात म्हटलं आहे, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (4 जानेवारी) खातेवाटप केले. तसेच ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मंजुरीसाठी रात्री 9.45 वाजता पाठवली. राज्यपाल तात्काळ स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा होती. मात्र, राज्यपाल विश्रांती घेत असल्याने सोमवारी सकाळीच या यादीवर मंजुरीची स्वाक्षरी करतील, असं सांगण्यात आलं. राज्यपालांच्या ‘विश्रांतीयोगा’मुळे मंत्रिमंडळाचे खातेवाटप रखडले आहे.”
सामनात मंत्रालयातील सूत्रांचा हवाला देऊन खातेवाटपाची संभाव्य यादीही जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे खातेवाटप खालीलप्रमाणे,
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच राज्यपाल लवकरच यावर शिक्कामोर्तब करतील, असंही सांगितलं. ते म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राला जशी मंत्रिमंडळ खातेवाटपाची प्रतीक्षा आहे, तशीच आम्हालाही आहे. अनेक पत्रकार मित्र त्याबद्दल फोन करून विचारणा करत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आज (4 जानेवारी) सायंकाळी 7.30 वाजताच मंत्रिमंडळाची खातेवाटप यादी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे पाठवली आहे. राज्यपाल त्यावर लवकरच शिक्कामोर्तब करतील, अशी आशा आहे.”