मुंबई : “खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये” अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर निशाणा साधण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो अग्रलेखाला देण्यात आला आहे. (Saamana Shivsena on Congress being Upset in Government)
“काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा त्यांना अनुभव आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते आणि सत्ता कोणाला नको, असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रीपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये” अशा शब्दात काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर भाष्य करण्यात आले आहे, तर भाजपला अप्रत्यक्ष इशारा देण्यात आला आहे.
“काँग्रेस पक्षाचेही बरे सुरु आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवली पाहिजे” असेही अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा : आधी थोरात, मग अशोक चव्हाण, आता नितीन राऊतांकडून नाराजी व्यक्त
“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कुरकुरणे तसे संयमी असते. घरात भावाभावांची भांडणे होतात. इथे तर तीन पक्षांचे सरकार आहे. थोडेफार कुरकुरणे होणारच. ‘मुख्यमंत्र्यांना भेटून काय ते बोलू’ असे थोरातांनी सांगितले. त्याच खाटेवर बसलेल्या अशोक चव्हाण यांनीही ‘इंडियन एक्सप्रेस’ला एक जोरदार मुलाखत दिली आणि तितक्याच संयमाने कुरकुरत सांगितले की ‘सरकारला अजिबात धोका नाही, पण सरकारमध्ये आमचेही ऐका’ असे अग्रलेखात म्हटले आहे. (Saamana Shivsena on Congress being Upset in Government)
हेही वाचा : ‘सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही’, अशोक चव्हाणांकडून नाराजी व्यक्त
“चव्हाण-थोरातांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्यायलाच हवे. कारण सरकारचा तिसरा पाय काँग्रेसचा आहे. राज्यपाल नियुक्त 12 विधान परिषद जागांच्या समान वाटपाचा मुद्दा आहे. काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ 44. शिवसेना 56 आणि इतर जोडीदार पकडून 64, तर राष्ट्रवादीचे 54. त्यामुळे या प्रमाणात वाटप व्हायला हरकत नाही.” असे म्हटले आहे.
“बदल्या, बढत्या, आम्हाला हाच सचिव पाहिजे, हा सरकारमधला निरंतर चालणारा डाव आहे. त्यामुळे सरकारला धोका होईल आणि राजभवनाचे दरवाजे कुणासाठी पहाटे पुन्हा उघडले जातील या भ्रमात कोणी राहू नये” असा अप्रत्यक्ष इशारा भाजपला देण्यात आला आहे.
VIDEO : Balasaheb Thorat | तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार : बाळासाहेब थोरात pic.twitter.com/X39L6mcE0i
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 13, 2020