मुंबई : “भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे पती किशोर वाघ (Kishor Wagh) यांच्यावर दाखल झालेला गुन्हा अयोग्य; आणि क्लिन चिट देऊनही राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) मागे लावलेली ईडीची चौकशी योग्य. भाजपची ही भूमिका म्हणजे, चित मैं जिता पट तू हारा, अशी आहे,” असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत (Sachin Sawant) यांनी लगावला. (Sachin sawant criticizes bjp on kishor wagh case filed by acb)
“भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांची चौकशी तत्कालीन फडणीस सरकारने सुरु केली. त्यानंतर आता त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा म्हणजे सूडूबुद्धी. मात्र, क्लिन चिट देऊनही राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मागे मोदी सरकारने ईडीची चौकशी लावली हे योग्य, भाजपची ही भूमिका म्हणजे चित मैं जिता पट तू हारा, अशी आहे.” असे ट्विट सचिन सावंत यांनी केले.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मागील काही दिवसांपासून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी भूमिका घेत सरकारवर दबाव टाकला होता. याच दरम्यान चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला. या कारणामुळे चित्रा वाघ यांच्या पतींवर सूडबुद्धाने कारवाई होत असल्याचा आरोप भाजपने केला. भाजपच्या या दाव्याने राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत होत्या. सरकारने भाजपच्या या दाव्याला फेटाळून लावले होते. त्यानंतर सावंत यांनी ही वरील ट्विट करत भाजपला पुन्हा धारेवर धरले.
किशोर वाघ यांची चौकशी फडणवीस सरकारने सुरू केली
पण त्यांच्यावर आता दाखल झालेला गुन्हा सूडाने- अयोग्य
एकनाथ खडसे यांची ACB व झोटींग आयोग चौकशीनंतर फडणवीस सरकारने क्लीन चिट दिली.
पण आता त्यांची मोदी सरकारने लावलेली ED चौकशी न्यायाने-योग्य
भाजपा ची भूमिका- चीत मैं जीता पट तू हारा?— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 28, 2021
किशोर वाघ हे मुंबईच्या परेल येथील गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते. 5 जुलै 2016 रोजी एका प्रकरणात त्यांना चार लाख रुपयांची लाच घेताना अटक झाली होती. त्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आले होते.
या प्रकरणात फडणवीस सरकारच्या काळात किशोर वाघ यांच्या 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या काळातील त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात आली होती. यामध्ये कायदेशीर उत्पन्न, गुंतवणूक, ठेवी, खात्यावरील रकमेची आवक जावक , वारसाहक्काची मालमत्ता, खर्च या गोष्टींची तपासणी करण्यात आली होती.
तपासात किशोर वाघ यांच्याकडे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची अपसंपदा आढळून आली होती. किशोर वाघ यांच्याकडे असणारी एकूण अपसंपदा एकूण उत्पन्नाच्या सुमारे 90 टक्के इतके होती. या खुल्या चौकशीच्या अहवालानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नवनाथ जगताप यांच्या तक्रारीवरून किशोर वाघ यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये 13(2) आणि 13(1) ई या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणामुळे 2019 मध्ये चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा तेव्हा रंगली होती.
इतर बातम्या :