मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज सकाळी 11 च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप समजू शकले नाही. शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक या ठिकाणी जाऊन सचिनने पवारांची भेट घेतली.
सध्या राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षाचे राजकीय नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. एकीकडे ही स्थिती असताना सचिन तेंडुलकरने शरद पवारांची सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने, या भेटीचे अंदाज बांधणं सुरु झालं आहे. या भेटीचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. सचिन जवळपास अर्धा तास पवारांच्या घरी होता. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती देणं सचिनने टाळलं.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी राज यांनी पवारांना पाडवा मेळाव्याचे आमंत्रण दिल्याचं सांगण्यात येत आहे. पवार राज ठाकरेंच्या मंचावर जाणार का याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.