योगेश बोरसे, पुणेः राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाहीये, ती एक टोळी आहे. आणि या टोळीचा गब्बरसिंग शरद पवार (Sharad Pawar) आहे, असं थेट वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केलंय. पुण्यात आज युवा संसद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत यांनी भाजपवर, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला तर राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर टीका केली. भाजपाला लोकसभेला किती जागा मिळतील, याची चिंता शरद पवारांनी करू नये, त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी, असा सल्ला गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. पडळकर आणि खोत या दोन आमदारांनी टीव्ही9 च्या प्रतिनिधींशी बोलताना हे गंभीर आरोप केले.
शरद पवार यांचे तीन खासदार राहिले तर बरं.. स्वतःच्या पक्षाची लायकी काय ते बघावी,.. आम्ही 400 ची गोष्ट करतोय ते अजून 4 वरच आहेत, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला. भाजपची चिंता करू नये, राष्ट्रवादी बघा कुठे चालली आहे? पार्टी विसर्जित करावी लागतेय, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलंय.
रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे. राजकारणात रहायचं असेल तर शरद पवार यांच्यावर टीका करणे सोडा, असा इशारा त्यांनी दिलाय. यावर गोपीचंद पडळकरांनी खोचक प्रतिक्रिया दिली. अशा पवारांना कोलत कोलतच मी राजकारणात आलोय. त्यामुळे त्यांनी मला सांगण्यापेक्षा शरद पवार आणि रोहित पवार यांनी दोघांनी एकत्रित बसलं पाहिजे. त्यांनी गेल्या ५० वर्षात कुणा-कुणाची वाट लावली हे आजोबांकडून समजून घेतलं पाहिजे, असं पडळकर म्हणाले.
तर सदाभाऊ खोत यांनीही राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. राष्ट्रवादी हा पक्ष नाहीय, ही एक टोळी आहे, आणि त्याचा गब्बरसिंह शरद पवार आहेत.. या टोळीचा बंदोबस्त पुढील दोन अडीच वर्षात होणार असल्याचा इशाराही सदाभाऊ खोत यांनी दिलाय.