शरद पवार हे ओसाड गावचे पाटील, संजय राऊत टाइम पास चॅनल.. कुणी उडवली खिल्ली?

| Updated on: Feb 13, 2023 | 9:28 AM

शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात गौतम अदानी यांचं कौतुक केलंय, यावरून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना ही टीका करण्यात आली.

शरद पवार हे ओसाड गावचे पाटील, संजय राऊत टाइम पास चॅनल.. कुणी उडवली खिल्ली?
Image Credit source: social media
Follow us on

सागर सुरवसे, सोलापूरः शऱद पवार (Sharad Pawar) हे ओसाड गावचे पाटील आहेत. त्यांच्या बोलण्याला फार अर्थ नाही. लक्ष देऊ नका, अशी खिल्ली माजी कृषी राज्यमंत्र्याने उडवली आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत हे टाइम पास चॅनल आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत ही धारदार टीका केली. तर सात महिने उलटूनही राज्याचा संपूर्ण मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही, यावरही त्यांनी अजब भाष्य केलंय. अजित पवार हेच यासाठी कारण असल्याचं ते म्हणालेत.

शरद पवारांवर काय प्रतिक्रिया?

शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात गौतम अदानी यांचं कौतुक केलंय यावरून सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, पवार साहेबांच्या पुस्तकात शेतकऱ्यांचं कौतुक झालं नाही, परंतु अदानींचं झालंय. ते ओसाड गावचे पाटील आहेत. त्यांच्या बोलण्याला फारसा अर्थ असत नाही. त्यामुळे ते बोलू शकतात, बोलणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचं अजब वक्तव्य

संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहे. विरोधकांकडूनही वारंवार विस्ताराबाबत बडे दावे करण्यात येत आहेत. अशातच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मोठं वक्तव्य केलंय. राज्याचा मंत्रिमंडळ अजित पवार यांच्यामुळेच होत नाहीये, असं उपरोधिक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय. सदाभाऊ खोत म्हणाले, अजित पवार यांचाच मुहूर्त अजून ठरत नाही. शपथविधी कधी घ्यायचा? हे नक्की झालं की मंत्रिमंडळ विस्तार होईल…

रविकांत तुपकरांवर काय प्रतिक्रिया?

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीयेत, म्हणून आत्मदहनाचं पाऊल उचललंय, यावरून सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात पोलिसांनीही संयम बाळगावा. एखादा दगड शेतकऱ्यांनी मारला असेल तर समजून घेऊ शकतो, कारण ती पोटातली आग असते. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने जाणून घ्यावेत, चर्चेतूनही मार्ग काढला जाऊ शकतो, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय.

भारत तुटलेलाच नाही, तर जोडायची काय गरज?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरही खोत यांनी टिप्पणी केली. ते म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. भारत देश हा तुटलेलाच नाहीतर जोडण्याची गरज नाही.भारत तुटलेला होता.. तो तुमच्या बाप दादांच्या काळामध्ये.. परंतु देशातल्या कष्टकरी, कामगार माणसाला जोडले गेले पाहिजे, त्याला उभे केले पाहिजे, यासाठी राहुल गांधींची यात्रा नाही निघाली. शेतीची लुटण्याची व्यवस्था, शेतीच्या लुटायची कहाणी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूनपासून सुरू होते… अशी टीका खोत यांनी केली आहे.