सागर सुरवसे, सोलापूरः संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion) प्रतीक्षेत आहे. विरोधकांकडूनही वारंवार विस्ताराबाबत बडे दावे करण्यात येत आहेत. अशातच माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मोठं वक्तव्य केलंय. राज्याचा मंत्रिमंडळ अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामुळेच होत नाहीये, असं उपरोधिक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय. अजित पवारांमुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. कारण त्यांचा मुहूर्त अजून ठरत नाही… असं खोचक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय.
सात महिने झाले तरी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, यावरून अजित पवार यांनी एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. नऊ महिन्यात बाळ जन्माला येतं, पण इथे सरकारला सात महिने झाले तरी विस्तार होत नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. यावरून सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी अजित पवार यांनाच कारणीभूत ठरवलं. ते म्हणाले, अजित पवार यांचाच मुहूर्त अजून ठरत नाही. शपथविधी कधी घ्यायचा? हे नक्की झालं की मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा टोला त्यांनी लगावला.
अजित पवारांना टोला लगावतानाच सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात गौतम अदानींचं कौतुक करण्यात आलंय. यावरून सदाभाऊ खोत म्हणाले, पवार साहेबांच्या पुस्तकात शेतकऱ्यांचं कौतुक झालं नाही, परंतु अदानींचं झालंय. ते ओसाड गावचे पाटील आहेत. त्यांच्या बोलण्याला फारसा अर्थ असत नाही. त्यामुळे ते बोलू शकतात, बोलणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीयेत, म्हणून आत्मदहनाचं पाऊल उचललंय, यावरून सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात पोलिसांनीही संयम बाळगावा. एखादा दगड शेतकऱ्यांनी मारला असेल तर समजून घेऊ शकतो, कारण ती पोटातली आग असते. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने जाणून घ्यावेत, चर्चेतूनही मार्ग काढला जाऊ शकतो, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरही खोत यांनी टिप्पणी केली. ते म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. भारत हा तुटलेलाच नाहीतर जोडण्याची गरज नाही.भारत तुटलेला होता.. तो तुमच्या बाप दादांच्या काळामध्ये.. परंतु भारतातल्या कष्टकरी, कामगार माणसाला जोडले गेले पाहिजे, त्याला उभे केले पाहिजे, यासाठी राहुल गांधींची यात्रा नाही निघाली.
शेतीची लुटण्याची व्यवस्था, शेतीच्या लुटायची कहाणी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूनपासून सुरू होते. महात्मा गांधीजींनी सांगितले होते खेड्यांकडे चला खेडी समृद्ध करा, हा खेड्यांचा देश आहे. मात्र पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितले खेडी लुटा आणि शहरांकडे चला.. हा देश खेड्यांचा नाही तर उद्योगांचा आहे.. खेडी भकास करूया म्हणजे पोटाची खळगी भरायला… असा संदेश दिला होता.