मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांना युक्रेनमधील विद्यार्थ्यांची चिंता आहे. पण महाराष्ट्रातील चिंता नाही. तिकडच्या विद्यार्थ्यांसाठी विमाने सोडा म्हणतात पण इथे एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना साधी एसटी सोडता येत नाही, अशा शब्दात रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. तसेच आम्ही आता आझाद मैदानात बसणार नाही. आता बसलो तर अनिल परब (Anil Parab) यांच्या बंगल्यासमोरच बसू. आंदोलनासाठी परत कामगारांना हाक देऊ. दुष्ट पद्धतीने तुम्ही वागणार असाल तर चालणार नाही. कामावर या म्हणून अनिल परब कामगारांना विनंती करत असल्याचं चित्रं निर्माण केलं जात आहे. एकीकडे असं चित्रं निर्माण करायचं आणि दुसरीकडे बांबू घालायचं म्हणून गोपनीयतेचं पत्रं का काढता? आता जर कामगारांना बांबू लावणार असाल तर आम्ही तुम्हालाही बांबू लावू. आमची खेड्यापाड्यातील आणि शेताभातातील माणसं आहेत. यांची माती आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कामगारांवर कारवाई करणाऱ्या एसटी महामंडळाच्या गोपनीय पत्राची आणि त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाची होळी केली. त्यानंतर ते मीडियाशी संवाद साधत होते. आम्ही शांततेने आंदोलन करत आहे. आमचं भांडण पोलिसांशी नाही. सरकार पोलिसांचा वापर करत आहे. ते चुकीचं आहे. सरकारनं संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवावा. या पद्धतीने काम करता येणार नाही. अनिल परब आणि मंत्रिमंडळ यांची एकच भूमिका दिसत आहे. ती म्हणजे संप मोडायचा. कारण कामगार संघटना चिडलेल्या आहेत. एका बाजुला गोड बोलून कामगारांना कामावर घ्यायचं. एकदा एसटी पूर्वपदावर आली की मग चौकशी करून यांना निलंबित करायचं हा या सरकारचा डाव आहे, असा दावा सदाभाऊ खोत यांनी केला.
या सरकारला एसटीचं खासगीकरण करायचं आहे. त्यांना जागा ढापायच्या आहेत. एकदा खासगीकरण झालं की महिन्याला फिक्स हप्ता येईल. यांना मराठी माणूस जगला पाहिजे, मराठी माणसाची रोजीरोटी राहिली पाहिजे याच्याशी काहीही घेणंदेणं नाही. माधव काळे नावाचा माणूस एसटीत वसुलीसाठी ठेवला आहे. त्यांना काढून टाकण्याची आमची मागणी आहे. त्यांना कंत्राटपद्धतीवर का ठेवलं आहे?, असा सवालच त्यांनी केला.
लालपरी हे महाराष्ट्राचं वैभव आहे. खेड्यापाड्यातील जनता, शेतकरी, शेजमजूर, विद्यार्थी एसटीने प्रवास करतात. हा प्रश्न सुटावा असं आमचं मत होतं. पण या सरकारला काही करायचं नाही. सुप्रिया सुळे आणि शरद पवार साहेब यांना युक्रेनमधील विद्यार्थ्याची चिंता लागली. महाराष्ट्रातील विद्यार्थी शाळेत पोहोचत नाहीत, त्याची ससेहोलपट होत आहे. त्यांची पवार साहेबांना चिंता का लागली नाही? तिकडे विमानं सोडा म्हणता, इकडे एसट्या सोडा ना. हे सरकार दुटप्पी भूमिकेने वागत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
सरकार जेवायला बोलावतात आणि ताटात काही नसतं अशी परिस्थिती सरकारची आहे. सकाळपासून अनेक कामगार आमच्याकडे आले. आमच्या चर्चा सुरु आहेत. आम्ही कामगारांच्या सोबत आहोत. सरकार तुमचं ऐकणार नाही तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही कामगारांना तारीख पे तारीख देत आहात. कामगारांसोबत हे सरकार चर्चा करत नाही. आम्ही कामगारांशी चर्चा करत आहोत. त्यांची भावना समजून घेत आहोत, असं सांगतानाच एसटी कामगारांच्या प्रश्नावर सरकारला राजकारणापलिकडे जाऊन पाहण्याची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
भाजप आमदार जयकुमार रावल यांच्याविरोधात ईडीकडे लेखी तक्रार; अनिल गोटे स्वत: ईडी कार्यालयात आले
शिळफाटा-महापे रोडवर आगीचे लोट, भंगाराच्या गोदामाला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल