पंढरपूर : आठवतयं ना तो तीन महिन्यापूर्वीचा किस्सा, ज्यावरुन चार चौघांमध्ये (Sadabhau Khot) सदाभऊ खोत यांची कोंडी झाली होती. आहो तोच हॉटेलमधील जेवणाच्या बिलावरुन एकजण त्यांच्याबरोबर चांगलाच भांडला होता. तीन महिन्यापूर्वी (Sangola) सांगोला येथे पंचायत राज समितीच्या दौऱ्यावर असताना खोत यांच्यावर हॉटेल मालक अशोक शिनगारे चांगलेच आक्रमक झाले होते. कार्यकर्ते जेवण करुन गेले आणि बील कोण देणार? असा सवाल त्याने सदाभाऊ खोत यांना केला होता. आता तीन महिन्यानंतर तो हॉटेल चालक पुन्हा चर्चेत आला आहे. कारण वाळू चोरी प्रकरणी पोलिसांनी त्यालाच अटक केल्याची माहिती (Pandharpur Police) पंढरपूर पोलिसांनी दिली आहे.
सदाभाऊ खोत यांच्याकडे जेवणाचे बील राहिल्याचा आरोप हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी केला होता. त्यासंबंधीच व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने शिनगारे हे चांगलेच चर्चेत आले होते. तर ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याने त्यांनी हे आरोप केल्याचे सदाभाऊ यांनी सांगितले होते. मात्र, मंत्री असतानाच त्यांच्यावर हे आरोप केल्याने राज्यभर हे प्रकरण गाजले होते.
पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील आण्णा पाटील हायस्कूलजवळ एका वाहनातून अवैध वाळू टाकली जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पो.नि.धनंजय जाधव यांनी पथकास घटनास्थळी पाठवून दिले. वाहतूक व वाळू उपसा परवाना आहे का? याची चौकशी केली तेव्हा सांगोला येथून अवैध वाळू उपसा करून तिसंगी येथे आणल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहन व चालक अशोक शिनगारे व तुषार सलगरे (रा.मांजरी, ता.सांगोला) यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
भर रस्त्यामध्ये हॉटेलच्या बिलावरुन अशोक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांची अडवणूक केली होती. त्याचवेळी हा वाळू चोर असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले होते. मात्र, त्यांच्यावर हा आरोप केल्याने ते असे म्हणत असल्याची चर्चा होती. पण तीन महिन्यानंतर शिनगारे हे खरोखरच चोर असल्याचे समोर आले आहे.