मुंबई : टीम इंडियाच्या प्रस्तावित भगव्या जर्सीवरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी भगव्या जर्सीवर आक्षेप घेत मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ भगवी जर्सी घालून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाच्या जर्शीचे रंग सारखेच असल्याने भारतीय संघाकडे भगव्या जर्सीचा पर्याय आहे. मात्र त्याला अबू आझमी यांनी आक्षेप घेतला आहे.
“मोदींना संपूर्ण देशाचं भगवीकरण करायचं आहे. मात्र त्यांनी लक्षात ठेवायला हवं की तिरंग्यामध्ये मुस्लिमांचा हिरवा रंगही आहे. अन्य रंगही तिरंग्यात आहेत, मग जर्सीसाठी केवळ भगव्या रंगालाच पसंती का? भारतीय संघाची जर्शी जर तिरंग्यात असेल तर ते उत्तम ठरेल”, असं अबू आझमी म्हणाले.
अबू आझमींचा हल्लाबोल
मोदी सरकार देशाचं भगवीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. देशाचा विकास नाही, बेरोजगारी वाढत आहे. डॉलरचा भाव वाढत आहे, महागाई वाढत आहे. मात्र भारताच्या क्रिकेट संघाला भगवा रंग दिला जात आहे. त्याला तिरंग्याचा रंग द्यावयाला हवा, असं अबू आझमींनी नमूद केलं.
मुस्लिम कब्रस्तानावरुन वाद
नवी मंबई घणसोली येथील मुस्लिम कब्रस्तानात मुस्लिम बांधव त्यांच्या नातेवाईकांचा दफनविधी करण्यासाठी गेले असता, तिथल्या स्थानिक रहिवाशांनी दफनविधी करण्यास विरोध केल्याचं अबू आझमी म्हणाले.
“ही कब्रस्तानाची जागा शासनाने 11 वर्षापूर्वी मुस्लिम समाजाला दिली आहे. पण ज्यांच्या डोळ्यात मुसलमान खुपतो, अशा मुस्लिमविरोधी समाजकंटकांनी कब्रस्तानात घुसून दफन करण्यास मनाई केली. इतकंच नाही तर मुसलमान पाकिस्तान मे चले जाव ! यहा दफनाने नही देंगे! अशा घोषणाही दिल्या. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करुन शांतता निर्माण केली”, असं अबू आझमी म्हणाले.
ही मुसलमान समाजाबाबत असलेली व्देषभावना आहे. यामुळे देशाची शांतता भंग केली जात आहे. आज विधानसभा सभागृहात मी औचित्याच्या मुद्याव्दारे हा प्रश्न उपस्थित केला, असं अबू आझमींनी सांगितलं.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला हा धर्मनिरपेक्ष देश आहे. सरकारने 11 वर्षापूर्वीच जागा दिली असतानाही आता दफनविधी करण्यास विरोध का ? या ठिकाणी पूर्वी मंदिर होते असा स्थानिकांचा दावा आहे. मग या गोष्टीचा विचार सरकारने जागा देताना का केला नाही? 11 वर्षापूर्वी स्थानिकांनी याला विरोध का केला नाही. या सर्वांचे भान ठेवून मुस्लिम समाजाला दफनविधी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अबू आझमी यांनी केली.
संबंधित बातम्या